मुंबई: दादर रेल्वे स्टेशन ते केईएम नवीन एसी बससेवा सुरु
याचे वैशिष्ट्य म्हणजे यात मिनी आणि मिडी बस सेवेत रुजू झाल्या आहेत. ही एसी बस असून ती दादर रेल्वे स्थानक ते केईएमपर्यंत धावणार आहे
दादर सारख्या गजबजलेल्या ठिकाणी नेहमी प्रचंड ट्रॅफिक आणि माणसांची वर्दळ पाहायला मिळते. दादर (Dadar) मध्ये बरीच महत्त्वाची ठिकाणे आहेत जिथे नेहमी असंख्य माणसांची वर्दळ पाहायला मिळते. सिद्धिविनायक मंदिर, शिवाजी पार्क ही त्यातीलच काही ठराविक ठिकाणं. अशा वर्दळीच्या ठिकाणी मुंबईकरांनी ओढाताण होऊ नये म्हणून आता दादर रेल्वे स्टेशन ते केईएमपर्यंत (KEM) नवीन एसी बस सेवा सुरु करण्यात आली आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे यात मिनी आणि मिडी बस सेवेत रुजू झाल्या आहेत. ही एसी बस असून ती दादर रेल्वे स्थानक ते केईएमपर्यंत धावणार आहे. या बससेवेमुळे केईएम आणि त्या परिसरातील रुग्णालयात जावे लागणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा आधार मिळणार आहे.
दादरहून केईएमला जाण्यासाठी रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा. यात टॅक्सीचालकांची मनमानीही सर्रासपणे चालायची. तसेच शेअर टॅक्सी वा स्वतंत्रपणे टॅक्सी घेणाऱ्या प्रवाशांना टॅक्सीचालकांच्या मुजोरीचा नेहमीच त्रास होत होता. या सर्व समस्या लक्षात घेता ही नवीन एसी बससेवा सुरु करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा- मुंबई लोकल मध्ये वाजणार अक्षय कुमार चे 'ओ बाला' गाणे? सुरक्षा आणि स्वच्छतेच्या दृष्टीने मध्य रेल्वेचा सामाजिक उपक्रम
नव्याने सुरु करण्यात आलेल्या बेस्टच्या A-217 क्रमांकाच्या एसी बसमुळे दादर रेल्वे स्टेशन ते केईएम हा प्रवास आता सुखकर आणि विशेष करुन वातानुकूलित होणार आहे. यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या एसी बसची तिकिट केवळ 6 रुपये असणार आहे.
बेस्टने सुरू केलेली ही बस सकाळी 6.50 वा. आणि शेवटची बस रात्री 10.40 वाजता सुटेल. या सेवेमुळे गोरगरीब रुग्ण, नातेवाईकचे पैसे तर वाचणार आहेच शिवाय त्रासही कमी होणार आहे.