Rohit Pawar On Mahayuti Government: राज्यातील महायुती सरकारची आमदार रोहित पवार यांच्याकडून पोलखोल (Watch Video)

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP-SP)पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारची पोलखोल केली आहे. आमदार पवार यांनी आपल्या एक्स (पुर्वीचे ट्विटर) हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे

Rohit Pawar | (Photo credit: archived, edited, representative image)

राज्य विधीमंडळाचे अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP-SP)पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारची पोलखोल केली आहे. आमदार पवार यांनी आपल्या एक्स (पुर्वीचे ट्विटर) हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. धक्कादायक म्हणजे हा व्हिडिओ ठाणे (Thane) जिल्ह्यातील मुरबाड (Murbad) येथील आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, केवळ रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे गावकऱ्यांना गर्भवती महिलेला झोळीत घालून पायी न्यावे लागत आहे. चिंताजनक बाब म्हणजे रस्त्याने चालताना झोळी वाहणारे दमल्यावर ते रस्त्यात मध्येच विश्रांती घेत आहेत. परिणामी गर्भवती महिलेच्या आरोग्याचा प्रश्न आणखी गंभीर बनण्याची शक्यता निर्माण होते.

रोहित पवार यांनी एक्स पोस्टमध्ये काय म्हटले

आमदार रोहित पवार यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, ''सामान्यांचं सरकार अशी जाहीरातबाजी करणाऱ्या या सरकारच्या अब्रुची लक्तरं वेशीवर टांगणारा हा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील आहे. हा व्हिडिओ ज्या मुरबाडमधील आहे तिथले आमदार भाजपाचे असून तिथले भाजपचे खासदार गेली पाच वर्षे केंद्रात मंत्री होते… हे सरकारमध्ये रस्त्यांमध्ये तर दोन हातांनी कमिशन खाल्लं जातंच पण मुख्यमंत्र्यांच्या ज्या विश्वासू मंत्र्याने ॲम्बुलन्स खरेदीत #खेकड्याप्रमाणे कोट्यवधी रुपयांची दलाली खाल्ली त्या मंत्र्याला खुद्द मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात साधी ॲम्बुलन्सही देता येऊ नये? त्यामुळंच प्रसूतीकळा आलेल्या गर्भवती महिलेला असं झोळीतून न्यावं लागलं.'' मुख्यमंत्री महोदय सामान्य आदिवासी महिला भगिनींच्या वेदना या सरकारला कळणारच नाही का? असा संतप्त सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. (हेही वाचा, Rohit Pawar On BJP: जनतेच्या मूळ मुद्द्यांपासून लक्ष हटवायचे ही भाजपची जुनी सवय; रोहित पवार यांची भाजपवर टीका)

व्हिडिओ

भाजपकडून राजकीय तडजोडी

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासाघाडी सरकारला जनमताच्या विरोधातील सरकार, तीन चाकांची रिक्षा म्हणणाऱ्या भाजपने आता स्वत:च तीन पायांचे सरकार स्थापन केले आहे. त्यासाठी त्यांनी तत्कालीन सत्ताधारी शिवसेना आणि अल्पावधीतच राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्याचा आरोप झाला. हे पक्ष भाजपने फोडले किंवा त्यातील नेत्यांनी स्वत:हून फोडले, यापैकी काहीही असले तरी महाविकासआघाडीची सत्ता जाऊन महायुतीची सत्ता आली हे निश्चीत. या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत तर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. हे सरकार सर्वसामान्य जनतेचे असल्याचा दावा हे नेते करतात. असे राजकीय नेत्यांकडून काहीही दावे केले जात असले तरी जमीनीवरिल परिस्थिती मात्र काहीशी वेगळीच आहे. आमदार रोहित पवार यांनी ती व्हिडिओच्या माध्यमातून पुढे आणल्याचे बोलले जात आहे.