औरंगाबाद: कोरोनाच्या भीतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस काकासाहेब कणसे यांची घाटी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
या धक्कादायक घटनेमुळे रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. काकासाहेब कणसे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे त्यांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.
कोरोनाच्या धास्तीने राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस काकासाहेब कणसे (Kakasaheb Kanse) यांनी औरंगाबादमधील घाटी सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या (Ghati Super Speciality Hospital) चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. काकासाहेब कणसे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे त्यांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.
प्राप्त माहितीनुसार, पैठण तालुक्यातील धनगाव येथील काकासाहेब कणसे यांच्यावर 21 सप्टेंबरपासून घाटी रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. 25 सप्टेंबर रोजी कणसे यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना आयसीसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर शौचास जाण्याचं कारण सांगत कणसे यांनी रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. यात काकासाहेब कणसे यांचा जागीचं मृत्यू झाला. (हेही वाचा - Covid-19 Positive Prisoners Escaped: सांगलीतील क्वारंटाइन सेंटरमधून 2 कोरोनाबाधित कैदी फरार)
पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. दरम्यान, काकासाहेब कणसे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, कोरोनाच्या भीतीने त्यांनी आत्महत्येसारख टोकाचं पाऊल उचललं असावं, अशी चर्चा सुरू आहे. या सर्व प्रकाराची माहिती मिळताच पैठणचे माजी आमदार संजय वाघचौरे घाटी रुग्णालयात पोहोचले. संजय वाघचौरे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे काकासाहेबांनी आत्महत्या का केली? याची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.
याशिवाय आज पहाटे काकासाहेब कणसे यांनी त्यांचा भाऊ गणेश कणसे याला फोन करून औरंगाबादला येण्यास सांगितले. त्यांनी आपल्याला खासगी रुग्णालयात दाखल करा, असे सांगितलं. मात्र, गणेश कणसे जेव्हा रुग्णालयाजवळ आले तेव्हा त्यांना आतमध्ये जाऊ दिले नाही. त्यानंतर काही वेळातचं काकासाहेब यांनी इमारतीहून उडी मारून आत्महत्या केली.