'पक्षांतर करुन पुन्हा निवडून येऊन दाखवाच', राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भाजपसह फुटीरांना आव्हान

वेळप्रसंगी या आमदारांना राजीनामा द्यायला सांगून पुन्हा निवडून आणायचे असा भाजपचा विचार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमिवर प्रसारमांध्यमांनी विचारले असता जयंत पाटील बोलत होते.

Jayant Patil | (Photo Credits: twitter)

विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षातील नेत्यांची पक्षांतरं करुन मेगा भरती करणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि फुटीरतावाद्यांना राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी थेट आव्हान दिलं आहे. सरकार स्थापन करायचे तर शिवसनेला सोबत घ्यायचे किंवा शिवसेना (Shiv Sena), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार फोडायचे आणि सरकार स्थापन करायचे. वेळप्रसंगी या आमदारांना राजीनामा द्यायला सांगून पुन्हा निवडून आणायचे असा भाजपचा विचार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमिवर प्रसारमांध्यमांनी विचारले असता जयंत पाटील बोलत होते. या वेळी बोलताना 'पक्षांतर करुन पुन्हा निवडून येऊन दाखवाच', असे थेट आव्हान जयंत पाटील यांनी भाजप आणि फुटीरतावाद्यांना दिले.

या वेळी बोलताना पाटील म्हणाले की, फुटीरांना योग्य जागा दाखवली जाईल. आता पहिल्यासारखी स्थिती राहीली नाही. असे जर कोणी फुटून गेले तर भाजप वगळता सर्वपक्षीय एकत्र येऊन पुन्हा आमचाच उमेदवार निवडून आणतील असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेकांना भाजपने आपल्या पक्षात घेतले होते. मात्र, पक्षांतर करणाऱ्यांना जनतेनेच धडा शिकवला याकडेही जयंत पाटील यांनी लक्ष वेधले. (हेही वाचा, भाजपच्या माजी आमदाराने घेतली राज ठाकरे यांची भेट; विधानसभा निवडणुकीत पक्षाने कापलं होतं तिकीट)

दरम्यान, दुसऱ्या बाजूला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही जयंत पाटील यांच्या विधानाशी पूरक असे विधान केले आहे. थोरात यांनी म्हटले आहे की, आमदार फुडण्याची आम्हाला अजिबात भीती नाही. जर अशी फुटाफूट झाली तर आम्ही त्याला धडा शिकवू. पण, असे धाडस कोणी करणार नाही, असे थोरात यांनी म्हटले आहे.