राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी घरातूनच केली कामकाजाला सुरुवात, खासदार सुप्रिया सुळे यांनी शेअर केला व्हिडिओ

राज्यातील शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना मदत द्या, असा सल्ला पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिला आहे.

Sharad Pawar (Photo Credits: Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर काही दिवसांपूर्वी दोन मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या. यातून बरे होऊन घरी परतलेले शरद पवार यांनी घरातूनच कामकाजाला सुरुवात केली आहे. त्यांची मुलगी तसेच खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी या संदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे. दरम्यान शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी कोरोना संकटाच्या काळात काही घटकांना मदत करण्याचा सल्ला दिला आहे. राज्यातील शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना मदत द्या, असा सल्ला पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिला आहे.

त्याचबरोबर नेहमी कामात व्यग्र असलेले शरद पवार घरातूनच कामाला सुरुवात केली. खासदार सुप्रिया सुळे यांनी काही वेळापुर्वी फेसबुक लाईव्ह केलं. त्यात पवार आपल्या निवासस्थानी कार्यकर्ते आणि काम घेऊन आलेल्या लोकांना भेटत आहेत. त्यावेळी त्यांच्या समस्या जाणून घेत काही सूचनाही करत असल्याचं या फेसबुक लाईव्हमध्ये पाहायला मिळत आहे.हेदेखील वाचा- Sharad Pawar In Breach Candy Hospital: ब्रिच कँडी रुग्णालयात शरद पवार यांच्यावर पित्ताशयावरील शस्त्रक्रिया यशस्वी

शरद पवार यांच्यावर नुकतीच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. एन्डोस्कोपीद्वारे शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरमधील मोठा स्टोन बाहेर काढण्यात आला. त्यामुळे आता शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होणार नाही.

शरद पवार यांना 3 एप्रिल रोजी ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल होता. त्या वेळीही पवार यांची प्रकृती उत्तम होती. परंतू, पुढे आणखी एक शस्त्रक्रिया करायची असल्याने डॉक्टरांनी शरद पवार यांना 15 दिवस सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला होता. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार हे मुंबई येथील निवासस्थान सिल्वर ओक येथे पोहोचले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत पत्नी प्रतिभा पवार, कन्या सुप्रिया सुळे आणि जावई सदानंद सुळे हे देखील उपस्थित होते.