NCP Party Manifesto: अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने प्रसिद्ध केला जाहीरनामा; जाणून घ्या आश्वासने व ठळक मुद्दे

मोदीजींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे, असे आमचे जनतेला आवाहन आहे.'

NCP Party Manifesto (संग्रहित संपादित प्रतिमा)

NCP Party Manifesto: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) जाहीरनामा (Manifesto) प्रसिद्ध केला, ज्यामध्ये राज्य, देश आणि कामगार यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचे आश्वासन दिले आहे. 'राष्ट्रासाठी राष्ट्रवादी' या थीमवर आधारित जाहीरनामा, सार्वजनिक सेवा आणि पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारे आर्थिक प्रगतीसाठी पक्षाची भूमिका आणि संकल्प स्पष्ट करतो. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. अजित पवार यांनी पक्षाचा दूरगामी जाहीरनामा तयार केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व आभार मानले.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पाठपुरावा, यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न, शेतकऱ्यांना एमएसपी मिळणे, पर्यावरण संतुलन राखण्यासाठी अपारंपरिक उर्जा स्त्रोताला चालना देणे आणि त्यावर अंकुश ठेवणे, जागतिक तापमानवाढीचे संकट, कृषी पीक विमा योजनेची व्याप्ती वाढवणे, शेतकरी सन्मान निधीत वाढ, मुद्रा कर्ज योजनेतील मर्यादा वाढ, जातनिहाय जनगणना, वनक्षेत्रातील जलसाठे, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताचे स्थायी सदस्यत्व असे स्थानिक ते जागतिक स्तरापर्यंतचे सर्व महत्त्वाचे मुद्दे जाहीरनाम्यात मांडण्यात आले आहेत.

जाणून घ्या जाहीरनाम्यातील मुद्दे-

दरम्यान, जाहीरनामा मांडताना अजित पवार म्हणाले, ‘आम्ही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली महायुती म्हणून लोकसभा निवडणूक लढवत आहोत आणि आमचा मोठा विजय निश्चित आहे. मोदीजींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे, असे आमचे जनतेला आवाहन आहे. अनेक लोक त्यांच्याकडे पाहतात आणि एनडीएचे ते एक मजबूत चेहरा आहेत. मोदींच्या विरोधात भूमिका मांडणारा सक्षम चेहरा विरोधी पक्षात नाही.’

ते पुढे म्हणाले, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण आणि रोजगार ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ग्रामविकासाची पंचसूत्री असून त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व काम करीत आहोत. यंदाची लोकसभा निवडणूक देशाचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली लढत असून त्यांना पाठबळ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. 'सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास', यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची श्रद्धा आहे. याच भूमिकेतून 'राष्ट्राचा विकास, राष्ट्राचा विश्वास आणि राष्ट्राची साथ', या त्रिसूत्रीसाठी यंदाची लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे.'