NCP On BJP: ताई! पंख छाटणारा शकुणी मामु, डोक्याला तेल लावलेले धर्मराज, पोरी पळवणारे दुःशासनही तुमच्या पक्षात; अमोल मिटकरी यांचा पंकजा मुंडे यांना अप्रत्यक्ष सल्ला

ताई तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुणी मा.मु. मोठा चतुर आहे हे विसरू नका. या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवल्या गेलंय. मामु सोबत डोक्याला तेल लावलेले धर्मराज व पोरी पळवून नेणारे दुःशासन पण आहेत. नरो वा कुंजरोवा होऊ देऊ नका.

Amol Mitkari | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

'पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), अमित शाह (Amit Shah,) आणि पक्षाध्यक्ष जे पी नड्डा (JP Nadda) हेच आपले नेते आहेत' असे दिल्ली वारीनंतर ठासून सांगणाऱ्या भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे ( Pankaja Munde) यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सल्ला दिला आहे. अमोल मिटकरी यांनी ट्विटरद्वारे सल्ला देताना पंकजा मुंडे यांचे थेच नाव घेतले नाही. परंतू, त्यांच्या विधानातील रोख पाहता ते पंकजा मुंडे यांना उद्देशून असल्याचे स्पष्ट होते. या वेळी त्यांनी पंकजांना उद्देशून 'नरो वा कुंजरोवा होऊ देऊ नका' असेही म्हटले आहे. दिल्लीला जाऊन आल्यानंतर पंकजा मुंडे यांनी काल (13 जुलै) कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी केलेल्या वक्तव्याचा आधार घेऊन टायमिंग साधत मिटकरी यांनी खोचक ट्विट केले आहे.

अमोल मिटकरी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''ताईंनी आज कौरावांना चांगलंच झोडपलं. ताई तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुणी मा.मु. मोठा चतुर आहे हे विसरू नका. या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवल्या गेलंय. मामु सोबत डोक्याला तेल लावलेले धर्मराज व पोरी पळवून नेणारे दुःशासन पण आहेत. नरो वा कुंजरोवा होऊ देऊ नका. (हेही वचा, Pankaja Munde: 'नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा माझे नेते' पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा नामोल्लेख टाळला)

अमोल मिटकरी ट्विट

दिल्लीला जाऊन आल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पक्षांतर्गत विरोधकांवर नामोल्लेख टाळत जोरदार टीकास्त्र सोडले होते. इतकेच नव्हे तर माझे नेते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि पक्षाध्य जे पी नड्डा हे आहेत, असे म्हणत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), चंद्रकांत पाटील यांसारख्या महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांचा नामोल्लेखही टाळला. पंकजा मुंडे यांनी दिल्ली येथे जाऊन नुकती केंद्रीय नेतृत्वाची भेट घेतली. त्यानंतर महाराष्ट्रात परतलेल्या पंकजा मुंबई येथे प्रसारमाध्यमांसमोर बोलत होत्या. पंकजा मुंडे यांनी बोलताना सांगितले की, मी कुणाला भीत नाही. पण सर्वांचा आदर करते. माझ्यावर स्वर्गिय गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार आहेत. मी निर्भय आहे. माझी निर्भयता माझे कार्यकर्ते आणि जनतेच्या जोरावर आहे. मी वयाने माझ्यापेक्षा मोठे असलेल्या व्यक्तीचा कधीही अनादर केला नाही. माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे की धर्मयुद्ध टळावं. धर्मयुद्ध टळावं अशीच माझी आजही इच्छा आहे. माझं युद्ध कौरवांविरुद्ध आहे.