महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय, पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी: जितेंद्र आव्हाड

सुजय यांच्या पक्षप्रवेशानंतर राधाकृष्ण पाटील काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे. बहुदा राधाकृष्ण विखे पाटील हे आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देतील अशी चर्चा आहे. दुसऱ्या बाजूला सुजय विखे पाटील यांच्या पक्षप्रवेशावरुन शिवसेनेने राधाकृष्ण विखे पाटील यांना जोरदार टोला लगावत ऑफर दिली आहे.

Jitendra Awhad | (Photo Credits: Twitter)

Lok Sabha Election 2019: महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. सर्वांनी, विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादीतील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी -जनहितार्थ जारी, असे ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सुजय विखे पाटील ( Sujay Vikhe Patil) यांच्या भाजप (BJP) प्रवेशावर खोचक टीका केली आहे. सुजय विखे पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचे चिरंजीव आहेत. आज (मंगळवार, 12 मार्च 2019) त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

दरम्यान, सुजय विखे पाटील यांचा भाजप प्रवेश रोखण्यासाठी सोमवारी दिवसभर काँग्रेसच्या गोटात जोरदार हालचाली सुरु होत्या. मात्र, त्याला यश आले नाही. सुजय विखे पाटील हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभआ निवडणूक लढवू इच्छितात. मात्र, आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला. राष्ट्रवादीने हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडावा यासाठी प्रदेश काँग्रेसमध्ये मोठा खल झाला. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला साकडे घालण्यात आले. अखेर काँग्रेसचे राष्ट्रीय नेते मल्लीकार्जून खर्गे आणि पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यापर्यंत हा विषय नेण्यात आला. अखेर, राहुल गांधी यांनी शरद पवार यांच्याकडे शब्द टाकला. मात्र, पवार यांनी विखे पाटील यांच्या दबावाच्या राजकारणाला दाद दिली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने हा मतदारसंघ सोडला नाही. परिणामी या ना त्या मार्गाने मैदानात उतरण्यासाठी सुजय विखे पाटील यांच्याकडे पर्याय नव्हता. परिणामी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा मार्ग स्वीकारला. (हेही वाचा, काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीवर सुजय विखे-पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश)

दरम्यान, सुजय विखे पाटील यांचा पक्षप्रवेश करुन भाजपने काँग्रेसला जबरदस्त तडाखा दिला आहे. सुजय यांच्या पक्षप्रवेशानंतर राधाकृष्ण पाटील काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे. बहुदा राधाकृष्ण विखे पाटील हे आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देतील अशी चर्चा आहे. दुसऱ्या बाजूला सुजय विखे पाटील यांच्या पक्षप्रवेशावरुन शिवसेनेने राधाकृष्ण विखे पाटील यांना जोरदार टोला लगावत ऑफर दिली आहे. सुजय विखे पाटील भाजपमध्ये गेले आहेत. आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेत यावे आणि युती मजबूत करावी असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.