Jayant Patil: 'राजकारणाचा स्तर घसरला नाही, काही लोकांचा स्तर घसरला आहे'; जयंत पाटील यांचा नारायण राणे आणि भाजपला टोला
राजकारणाचा स्तर घसरला आहे का? असे विचारले असता राजकारणाचा स्तर घसरला नाही, काही लोकांचा स्तर घसरला आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी नारायण राणे यांना लगावला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबाबतचे वक्तव्य महाराष्ट्रातील जनतेचा अपमान करणारे आहे. या आधी अशा प्रकारचे वक्तव्य कोणीही केले नाही. नारायण राणे यांनी केलेल्या कालच्या वक्तव्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या प्रकारचे लोक निवडले आहेत याचीच चुणूक दिसते, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी म्हटले आहे. राजकारणाचा स्तर घसरला आहे का? असे विचारले असता राजकारणाचा स्तर घसरला नाही, काही लोकांचा स्तर घसरला आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी नारायण राणे यांना लगावला आहे.
नारायण राणे यांचे वक्तव्य हे भरतीय जनता पक्षाचे अधिकृत वक्तव्य आहे काय हे भाजपच्याच नेत्यांनी स्पष्ट करावे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांनी यांनी राणे यांच्या वक्तव्याबाबत भूमिका स्षष्ट करावी, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, नारायण राणे यांचे वक्तव्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच भूमिका आहे असे म्हटले जाईल. कारण मदींनीच नारायण राणे यांना मंत्री केले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी आपली पक्षाची भूमिका स्पष्ट करावी, असे जयंत पाटील यांनी म्हटले. (हेही वाचा, Varun Sardesai: हे सगळे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे ग्रॅज्युएट, वरुण सरदेसाई यांचा भाजपला टोला)
नारायण राणे यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करुन एक प्रकारे घटनेचाच अपमान केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जेव्हापासून राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत तेव्हापासून शिवसेनेने खरोखरच संयम दाखवला आहे. मात्र, काही घटकांकडून जाणीवपूर्वक टोकाची भाषा केल्यामुळे शिवसैनिकाकडून अॅक्शनला रिअॅक्शन आली असावी. जर काही संघर्षात्मक, हिंसात्मक प्रकार घडला असेल तर गृहमंत्रालय आवश्यक कारवाई करण्याची जबाबदारी घेईन. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणत्याही प्रकारच्या हिंसेचे समर्थन करणार नाही. मात्र, अशा प्रकारची घटना घडल्याचे माझ्या माहितीत नाही, जर काही घडले असेल तर गृहविभाग त्याबाबत काळजी घेऊन, असे जयंत पाटील म्हणाले. तसेच, देशात पेट्रोल-डिझेल दरवाढ, महागाई, बेरोजगारी असा भडका उडाला असताना जन आशीर्वाद यात्रा काढून कसले आशीर्वाद घेत आहात? असेही जयंत पाटील या वेळी म्हणाले.