Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; Endoscopy नंतर शस्त्रक्रिया होणार
पोटदुखीचा सौम्य त्रास काल (रविवार, 29 मार्च) जाणवल्यानंतर पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांच्या मुत्राशयामध्ये काही त्रास असल्याचे प्राथमिक निदान आहे.
शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे ब्रीच कँडी (Breach Candy Hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटदुखीचा सौम्य त्रास काल (रविवार, 29 मार्च) जाणवल्यानंतर पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांच्या मुत्राशयामध्ये काही त्रास असल्याचे प्राथमिक निदान आहे. येत्या 31 मार्च रोजी त्यांच्यावर एडोस्कोपी (Endoscopy ) आणि शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे पुढील सूचना येईपर्यंत सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्त नवाब मलिक यांनी दिली आहे. मलिक यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली.
दरम्यान, शरद पवार देशातील पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचार करणार होते. यात प्रामुख्याने पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये प्रचारदौऱ्यांची आखणीही केली होती. परंतू, आता प्रकृतीअस्वास्थ्यामुळे पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पुडील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. (हेही वाचा, NCP ने फेटाळले शरद पवार व अमित शाह यांच्या बैठकीचे वृत्त; अशी कोणतीही भेट झाली नसल्याची नवाब मलिक यांची माहिती)
दरम्यान, शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत प्रसारमाध्यमांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या नेत्यांकडे विचारणा केली. परंतू, सर्वांनी काहीच माहिती नसल्याबद्दल सांगितले. जितेंद्र आव्हाड, विद्या चव्हाण यांनीही फारशी माहिती नसल्याचे म्हटले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही आपण माहिती घेत आहोत असे सांगितले.
शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात गेल्या आठवड्यात कथीत भेट झाल्याची चर्चा आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला. या आरोपानंतर ही कथीत भेट झाल्याचे वृत्त आल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.