Navneet Rana यांनी दाऊदशी संबंध असलेल्या Yusuf Lakdawala याच्याकडून घेतले 80 लाखाचे कर्ज; खासदार Sanjay Raut यांचा आरोप

नंतर 09 सप्टेंबर 2021 रोजी आर्थर रोड तुरुंगात त्याचा मृत्यू झाला

Sanjay Raut (Pic Credit - ANI)

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Navneet Rana and Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर या दोघांनाही राजद्रोहाचा आरोप ठेऊन अटक करण्यात आली. आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवनीत राणा यांनी युसूफ लकडावाला याच्याकडून 80 लाखांचे कर्ज घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

युसूफ लकडावालाचे नाव अंडरवर्ल्डशी जोडले गेले आहे. हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित असून आता याची ईडी चौकशी करणार का?, असा सवालही त्यांनी केला आहे. युसूफ लकडावालाचे नाव डी-गँगशी जोडले गेले असून राणा यांनी त्याच्याकडून 80 लाखांचे कर्ज घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी नवनीत राणा यांचे प्रतिज्ञापत्र शेअर केले असून त्यात नवनीत राणा यांनी युसूफ लकडावाला याच्याकडून 80 लाखांचे कर्ज घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

दाऊदीशी संबंध असल्याच्या आरोपावरून युसूफ लकडावालाला ईडीने अटक केली होती. युसूफ लकडावालाचा ईडीच्या कोठडीत मृत्यू झाला होता. आता संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्यावर युसूफ लकडावालासोबत संबंध असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, गेल्या वर्षी 29 मे रोजी अंमलबजावणी संचालनालयाने बांधकाम व्यावसायिक आणि चित्रपट फायनान्सर असल्याचा दावा करणाऱ्या युसूफ एम लकडावाला याला अटक केली होती. 50 कोटी किमतीच्या जमिनीची बनावट कागदपत्रे बनवल्याप्रकरणी त्याला ईडीने मनी लाँडरिंग कायद्याच्या कलमांतर्गत अटक केली होती.

(हेही वाचा: Hanuman Chalisa Row: महाराष्ट्रात सरकार बनवता न आल्याने भाजप अस्वस्थ; संजय राऊत यांचा दावा)

लकडावालाने ही जमीन ताब्यात घेण्याच्या बदल्यात सरकारी अधिकारी, इस्टेट एजंट आणि इतरांना 11.5 कोटी रुपयांची लाच दिली होती. नंतर 09 सप्टेंबर 2021 रोजी आर्थर रोड तुरुंगात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, यापूर्वी मावळ तालुक्याचे तत्कालीन उपनिबंधक जितेंद्र बडगुजर यांनी लकडावाला याच्याविरोधात ऐनवेळी तक्रार केली होती. यानंतर लकडावाला याच्याविरोधात लुकआउट परिपत्रक जारी करण्यात आले. 12 एप्रिल 2019 रोजी लकडावालाला अहमदाबाद विमानतळावरून अटक करण्यात आली होती.