Navi Mumbai: हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे विवाहितेची आत्महत्या; पतीस अटक
पोलिसांनी पीडितेचे सासरे आणि मेहुणे यांच्यावरही आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पत्नीच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून खारघर पोलिसांनी (Kharghar police) मुंबईतील 30 वर्षीय रेल्वे टीटीईला (Railway TTE) अटक केली आहे. त्याचबरोबर पीडितेचे सासरे आणि मेहुणे यांच्यावरही आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, पीडित पुष्पम कुमारीचा (Pushpam Kumari) 14 ऑक्टोबर रोजी आत्महत्येमुळे मृत्यू झाला होता. दुसऱ्या दिवशी तिच्यावर अंतिम संस्कार झाल्यानंतर तिचे वडील जनार्दन कुमार (61) यांनी पती पवनकुमार संतोषी (Pawankumar Santoshi) आणि सासरच्या लोकांविरुद्ध एफआयआर (FIR) नोंदवली होती. (Pune Suicide Case: पुण्यामध्ये लष्करातील महिला अधिकाऱ्याची आत्महत्या, खून केल्याचा पोलिसांचा संशय)
पीडित पुष्पम कुमारी (27), तिचा पती पवनकुमार संतोषी, सासरे सहदेव प्रसाद, सासू मालती देवी आणि वहिनी सीमा देवी यांच्यासह खारघर नोडच्या रंजनपाडा गावात राहत होते. चार आरोपींविरोधात कलम 306, 498 ए आणि 34 अंतर्गत एफआयआर नोंदवल्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी आम्ही पवनकुमार संतोषीला अटक केली. पनवेल न्यायालयाने त्याला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आणि नंतर त्याला दंडाधिकारी कोठडीत पाठवले. इतर तीन आरोपी बिहारमध्ये त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. त्यामुळे त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक तेथे पाठवले जाईल, अशी माहिती खारघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक संदीपन शिंदे यांनी दिली.
पीडितेचे वडील जनार्दन कुमार यांनी केलेल्या एफआयआरनुसार, मार्च 2019 मध्ये त्यांच्या मुलीचे लग्न पवनकुमारसोबत झाले होते. संतोषी मुंबई रेल्वेमध्ये टीटीई म्हणून काम करत असल्याने कुमार यांनी लग्नासाठी सहमती दर्शविली होती. लग्नानंतर पुष्पम कुमारी बिहारमध्ये पती आणि सासऱ्यांसोबत राहिली. पण लग्नाच्या अवघ्या तीन महिन्यांतच पती आणि सासरच्या लोकांकडून मारहाण केली जात असल्याचे तिने तिच्या वडीलांना सांगितले.
पुष्पमच्या वडिलांनी 1 लाख रुपयांची हुंड्याची मागणी आणि पवनकुमारसाठी कारची मागणी पूर्ण करण्यास नकार दिल्यामुळे पीडितेला त्रास दिला जात होता. त्यानंतर पुष्पम कुमारी वडिलांकडे राहायला आली.
नंतर पती व सासरच्यांनी तिला त्रास न देण्याचे आश्वासन दिले व तिला खारघरला घेऊन आले. मात्र तिचा पती आणि सासरचे लोक तिचा हुंड्यासाठी छळ सुरुच होता. 14 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास संतोषी यांचे घरमालक सुभाष चौधरी यांनी कुमार यांना त्यांची मुलगी पुष्पम हिने आत्महत्या केल्याची माहिती दिली. त्यामुळे त्यांनी बिहारहून नेऊन तिच्यावर अंत्यसंस्कार केले. दुसऱ्या दिवशी त्याने आरोपीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि हुंडा छळ केल्याचा गुन्हा दाखल केला.