नवी मुंबई: वाशी मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी फोडलं MSEB कार्यालय; अवाजवी बिलावरून खळ्ळ खट्याक आंदोलन
वाशी येथील सेक्टर 17 मध्ये असणार्या एमएसएबी कार्यालयाची मनसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली आहे.
कोरोना व्हायरस लॉकडाऊनमध्ये वीज वितरण कंपन्यांकडून ग्राहकांना देण्यात आलेल्या अवाजवी बिलावरून सामान्य त्रस्त आहेत. दरम्यान यावरूनच आज नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने MSEB कार्यालयाला झटका दिला आहे. दरम्यान वाशी येथील सेक्टर 17 मध्ये असणार्या एमएसएबी कार्यालयाची मनसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली आहे. वीज कंपनीने अवाजवी बील आकारल्याने काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले होते. सरकारकडून दिलासा मिळाला नाही तर मनसे त्यांच्या स्टाईलमध्ये वीज कंपन्यांना झटका देईल असे त्यामध्ये नमूद करण्यात आले होते. दरम्यान आज त्याचाच प्रत्यय नवी मुंबईमध्ये आला.
मीडीया रिपोर्ट्सनुसार नवी मुंबईमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी MSEB कार्यालयाची तोडफोड केली आहे. दारं-खिडक्यांच्या काचा फोडल्या आहेत. तर अवाजवी बिलांची दहीहंडी देखील त्यांनी फोडली आहे.
नागपूरामध्ये काल एका व्यक्तीने अवाजवी वीज बिल पाहून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. 30हजार वीज पाऊल या ग्राहकाच्या पायाखालची जमीन सरकली होती. त्यानंतर दारूच्या नशेत आणि नैराश्यात राहणार्या व्यक्तीने अंगावर रॉकेल टाकून स्वतःला पेटवले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान मागील महिन्यात मनसेच्या शिष्टमंडाळाने महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी मंत्र्यांना वीज बील कमी करण्याबाबत पत्र दिलं होतं. ऊर्जामंत्र्यांसोबत झालेल्या या बैठकीला मनसे नेते अविनाश अभ्यंकर, बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील उपस्थित होते.