Navi Mumbai Metro Services Begin on Line No 1 Today: नवी मुंबई मेट्रो आजपासून नागरिकांच्या सेवेत; इथे पहा तिकीट दर, वेळापत्रक
या मेट्रोची सेवा रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
नवी मुंबईकरांची मेट्रोची (Navi Mumbai Metro) प्रतिक्षा आता संपली आहे. सिडको (CIDCO) कडून 11.10 किलोमीटर अंतरासाठी लोकार्पण सोहळ्याशिवाय वाहतूक सुरू करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. आज 17 नोव्हेंबर दिवशी पेंधार ते बेलापूर दरम्यान मेट्रो सेवा सुरू होत आहे. दुपारी 3 वाजल्यापासून ही सुविधा सुरू होत आहे. या मेट्रोची सेवा रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेमध्ये दर 15 मिनिटांनी मेट्रोची सेवा चालवली जाणार आहे.
नवी मुंबई मेट्रो दरपत्रक
नवी मुंबई मेट्रो मध्ये किमान भाडं 10 रूपये आहे. 0 ते 2 किमी पर्यंत 10 रूपये, 2 ते 4 किमी पर्यंत 15 रूपये, 4 ते 6 किमी पर्यंत 20 रूपये, 6-8 किमी पर्यंत 25 रूपये, 8-10 किमी पर्यंत 30 रूपये आणि 10 किमीच्या पार 40 रूपये तिकीट मोजावं लागणार आहे. मुंबई मेट्रोला आवश्यक सार्या मंजुरी देण्यात आल्या होत्या पण राज्य सरकार कडून पंतप्रधानांची वेळ घेऊन त्यांच्या हस्ते या मेट्रोचं उद्घाटन करण्याचा मानस होता पण त्यामध्ये वेळ जात असल्याने हा उद्घाटन सोहळा लांबणीवर पडत होता.
नवी मुंबई मेट्रो स्थानकं
बेलापूर ते पेंधार दरम्यान 11 स्थानकं असणार आहेत. तर डेपो तळोजा पंचकुंड मध्ये असणार आहे.
नवी मुंबई मेट्रोला सर्व स्थानकांच्या एंट्री आणि एक्झिट पॉईंट्स हे उत्तर आणि दक्षिण बाजूला आहेत.त्याशिवाय, स्टेशन परिसरात वाहन पार्किंगसाठी जागा, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी रॅम्प, पादचाऱ्यांसाठी फूटपाथ, ऑटोरिक्षा पार्किंग, अखंड वीज पुरवठ्यासाठी डिझेल जनरेटरची व्यवस्था, कॉन्कोर्स आणि प्लॅटफॉर्मवर प्रवासी घोषणा यंत्रणा, सीसीटीव्ही अशा सुविधा असतील. दिव्यांगांसाठी विशेष स्वच्छतागृहांची तरतूद आहे.