Navi Mumbai and Palghar Accident News: दोन वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू, मृतांमध्ये चिमुकलीचा समावेश
मृतांमध्ये चिमुकलीचाही समावेश आहे. अपघाताची पहिली घटना नवी मुंबई (Navi Mumbai) मनपा मुख्यालय इमारतीसमोर असणाऱ्या उलवा उड्डाणपुलावर घडली. ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला.
Accident News: राज्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चिमुकलीचाही समावेश आहे. अपघाताची पहिली घटना नवी मुंबई (Navi Mumbai) मनपा मुख्यालय इमारतीसमोर असणाऱ्या उलवा उड्डाणपुलावर घडली. ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला. दुसरी घटना मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai Ahmedabad National Highway) घडली ज्यात एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरु केले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
नेरुळच्या दिशेने निघालेल्या कारची ट्रकला पाठिमागून धडक
उलवा उड्डाणपुलावर घडलेला अपघात गुरुवारी रात्री (23 नोव्हेंबर) पावणे दहाच्या सुमारास घडला. कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. कारमधील दोघांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचे समजते. उलवेकडून नेरुळच्या दिशेने निघालेल्या भरधाव कारने समोर निघालेल्या ट्रकला पाठिमागून जोरदार धडक दिली. ही धकड इतकी जोरदार होती की, कारचे बोनेट ट्रकच्या पाठिमागच्या भागात घुसले. ज्यामुळे कारमधील प्रवाशांनाही मोठी दुखापत झाली. ते कारमध्येच अडकून पडल्याने त्यांना बाहेरही येता येत नव्हते. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच एनआरआय पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदत आणि बचावर कार्य राबवत जखमींना रुग्णालयात दाखल केले. वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल यांनी सांगितले की, अपघाताची चौकशी सुरु असून अद्याप कोणावरी गुन्हा दाखल केला नाही.जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. (हेही वाचा, Kolhapur Bus Accident: गोवा-मुंबई खाजगी बस राधानगरी रोड वर उलटली; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू)
उलवा उड्डाणपूलावरील अपघाताचा व्हिडिओ
मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai Ahmedabad National Highway) घडलेल्या अपघाताच्या दुसऱ्या घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचे प्राण गेले. ही घटना पालघर येथील मेंढवन घाटात घडली. मृतांमध्ये चिमुकलीचाही (वय 5 वर्षे) समावेश आहे. एकाच कुटुंबातील लोक कारने प्रवास करत असताना गुरुवारी (23 नोव्हेंबर) रोजी ही घटना घडली. हर्षद गोडबोले (वय 42), आनंदी गोडबोले (वय 5) आणि वाहन चालक मिलिंद वैद (वय 43) अशी मृतांची नावे आहेत. हर्षदा गोडबोले (वय 37), अद्वैत गोडबोले ( वय 12) हे या अपघातात गंभीर जखमी झाले. सर्व जण पुणे येथील रहिवासी आहेत.
एक्स पोस्ट
रस्ते अपघात आणि या अपघातांमध्ये होणारे मृत्यू हा नेहमीच चिंतेचा विषय ठरला आहे. अपघात टाळण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार तसेच पोलिसांकडून अनेक प्रयत्न केले जातात. तरीही, अपघातांचे आणि त्यात होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण चिंता निर्माण करणारे आहे.