दैनिक नवकाळाचे संपादक व ज्येष्ठ पत्रकार नीलकंठ खाडिलकर यांचे निधन
त्यांच्या राहत्या घरात त्यांचे निधन झाले असून आज दुपारी चंदनवाडी स्मशानभूमीत (Chandanwadi) त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होणार आहेत
दैनिक नवाकाळचे (Navakal) माजी संपादक व ज्येष्ठ पत्रकार नीलकंठ खाडिलकर (Nilkanth Khadilkar) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या राहत्या घरात त्यांचे निधन झाले असून आज दुपारी चंदनवाडी स्मशानभूमीत (Chandanwadi) त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होणार आहेत. तत्पूर्वी गिरगाव येथील ‘नवाकाळ’ कार्यालयात आज, दुपारी 12 ते 2 यादरम्यान त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
नीलकंठ खाडिलकर यांची आणखीन एक महत्वाची ओळख म्हणजे ज्येष्ठ नाटककार आणि ‘केसरी’ चे माजी संपादक कृ. प्र. खाडिलकर यांचे ते नातू होते. ' अर्थशास्त्र हा विषय घेऊन ते बी.ए. ऑनर्स पर्यंत खाडिलकर यांचे शिक्षण झाले होते. 'अग्रलेखांचा बादशहा', एक उत्तम मुलाखतकार आणि तेज लेखणीचा पत्रकार अशी त्यांची ओळख होती. एकेकाळी खाडिलकर यांनी घेतलेल्या गोळवलकर गुुरुजी आणि सत्य साईबाबा यांच्या मुलाखती अतिशय गाजल्या होत्या.याशिवाय ‘दैनिक संध्याकाळ’ या नावाचे सायंदैनिकही खाडिलकर संपादित करत असत.खाडिलकर यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबासमवेत त्यांचे लेखन प्रत्यक्ष वाचलेल्या वाचकांकडूनही शोक व्यक्त केला जात आहे.
सुप्रिया सुळे ट्विट
तर्कशुद्ध आणि संदर्भा सहित ऐतिहासिक लेखन करण्यात त्यांचा हातखंडा होता, यामार्फत इतिहासाच्या अनेक घटनांसंदर्भात त्यांनी वाचकांचे प्रबोधन केले. वर्तमान सामाजिक-राजकीय परिस्थितीचे अभ्यासू व विवेकी विवेचनही वाचकांपर्यंत पोहचविले. खाडिलकर यांचे ‘हिंदुत्व’ हे पुस्तक समीक्षकांच्या आणि वाचकांच्या पसंतीस उतरलं.