Hasan Mushrif On Chandrakant Patil: शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचा मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला समाचार
त्यांचा अभ्यास नसतो, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एका मेळाव्यात शरद पवार यांच्यावर टीका केली होती.
राजकारणात येण्यापूर्वी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) मोठे नेते वाटायचे, मात्र राजकारणात आल्यावर कळाले ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो, अशी टीकाभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एका मेळाव्यात केली होती. या टीकेवरून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी चंद्रकात पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. 'महाराष्ट्रातील सत्ता गेल्यामुळेच चंद्रकांत पाटील हे मानसिक संतुलन ढासळल्यासारखी वागत आहेत. डोक्यावर परिणाम झाल्यागत, खुळ्यासारखे ते बडबडत आहेत', अशी टीका त्यांनी केली आहे. यामुळे चंद्रकात पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात शाब्दीक चकमक सुरु होण्याची शक्यता आहे.
हसन मुश्रीफ यांनी आज येथे झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या प्रचार मेळाव्यात आले होते. त्यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. 'बहुजनांचे नेतृत्व म्हणून शरद पवार यांनी नवा महाराष्ट्र घडविला. लोकसभेच्या दहा ते बारा व विधानसभेच्याही दहा ते बारा निवडणुका ते जिंकले. देशाचे कृषी मंत्री, संरक्षण मंत्री या पदांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दिलेले योगदान निश्चितच मोठे आहे. राज्यात आणि केंद्रातही विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी काम केले. तसेच ते एकदाही पराभूत झालेले नाहीत', अशा शब्दांत पवारांच्या नेतृत्वाचे मोठेपण सांगताना मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांना लक्ष्य केले आहे. हे देखील वाचा- CM Uddhav Thackeray Live Today: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8 वाजता जनतेला संबोधणार; काय महत्त्वाची घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष
चंद्रकात पाटील यांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेते अजित पवार यांनीदेखील प्रत्युत्तर दिले आहे. ज्यांची योग्यता नाही, पात्रता नाही. त्यांनी काय टीका करावी, ज्या पवार साहेबांनी समाज आणि राजकारणात 60 वर्ष काम केले आहे. त्याना महाराष्ट्राची जाण आहे. त्यांच्या शब्दाला दिल्लीमध्ये वजन आहे, हे सर्वांनी पाहिले आहे. अशा वेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासारख्याला पवार साहेबाबद्दलचे विधान शोभत नाही. ऐकेकाळी साहेबांबद्दल काय विधान केले होते? हे सर्वांच्या आठवणीत असेल, त्यामुळे त्यांचे आजचे विधान म्हणजे विनाश काले विपरीत बुद्धी म्हणावी लागेल, असेही अजित पवार म्हणाले आहेत.