National Youth Festival 2024: नाशिक येथे 12 ते 16 जानेवारी दरम्यान होणार राष्ट्रीय युवा महोत्सव; PM Narendra Modi करणार उद्घाटन

युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी हा महोत्सव उपयुक्त ठरणार आहे.

PM Modi | Twitter

राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी (National Youth Festival) महाराष्ट्रातल्या नाशिकची (Nashik) निवड झाली. ही महाराष्ट्रासाठी एक मोठी संधी आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनात कुठलीही कमतरता भासू देऊ नका, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणारा हा महोत्सव यशस्वी करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. राज्यभरातील युवकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला.

युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी हा महोत्सव उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी राज्य शासनाला मिळाली आहे. त्यामुळे नाशिक येथे दिनांक १२ ते १६ जानेवारी या कालावधीत २७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव २०२४ होणार आहे. त्यामध्ये देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांच्यातील युवांचे चमू सहभागी होणार आहेत. त्यामुळे महोत्सवाचे आयोजन यशस्वी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

या महोत्सवात २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश यातील प्रत्येकी १०० युवांचा चमू, राष्ट्रीय सेवा योजना युवा स्वयंसेवक, नेहरू युवा केंद्र संघटन युवा स्वयंसेवक असे सुमारे ८ हजार जण यात सहभागी होणार आहेत. १२ जानेवारीला या महोत्सवाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. नाशिक येथील तपोवन मैदानावर उद्घाटन समारंभ होणार आहे. महोत्सवांतर्गत सांस्कृतिक, कौशल्य विकास, युवा कृती असे स्पर्धात्मक कार्यक्रम होणार आहेत. त्यामध्ये समूह लोकनृत्य, लोकगीत, कथा लेखन, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व, छायाचित्र, हस्तकला, वस्त्रोद्योग, कृषी उत्पादने यांचा समावेश असणार आहे. (हेही वाचा: Maharashtra Weather Update: महाराष्ट्रासह 7 राज्यांना अवकाळीचा इशारा, विदर्भात पारा 10 अंशाच्या खाली)

महोत्सवाच्या आयोजनासाठी विविध समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कार्यकारी समिती, विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समिती गठित करण्यात आली आहे. त्याचबरोबर गृह, वित्त, महसुल, कृषी, उच्च व तंत्रशिक्षण, सांस्कृतिक कार्य, पर्यटन, शालेय शिक्षण या विविध विभागांचा सहभाग असून त्यांनी समन्वयातून या महोत्सवाचे आयोजन करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी निवास, भोजन व्यवस्था, कार्यक्रमस्थळ याबाबत आढावा घेतला. त्याचबरोबर महोत्सवासाठी करण्यात आलेले बोधचिन्ह, घोषवाक्य याबाबत क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनी सादरीकरण केले.



संबंधित बातम्या