राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 लेकरांसह 100 फूट खोल दरीत उडी; नळदुर्ग किल्ल्यावरील घटना
नळदुर्ग पोलिसांनी घटनेचा तपास हाती घेतला असून, कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांची शहानिशा केली जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे अंबुलगा, व्हंताळ आणि परिसरात शोककळा पसरली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावर (Naldurg Fort) गुरुवारी घडलेल्या दुर्घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून, या प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू अश्विनी मनोहर पौळ (National Wrestler Ashwini Paul) यांचा आणि त्यांच्या साडेपाच वर्षीय मुलगा अजिंक्य याचा किल्ल्यातील उपळी बुरुजावरून पडून जागीच मृत्यू झाला. जुळ्या मुलींपैकी क्रांती हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुसरी मुलगी वीरा गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. अश्विनी यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी कौटुंबिक छळाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप केला आहे. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर नळदुर्ग पोलिसांकडून सर्व बाजूंनी सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
अश्विनी पौळ सोबत काय घडले?
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अश्विनी पौळ ३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी एक ते दोनच्या सुमारास आपला मुलगा अजिंक्य आणि जुळ्या मुली क्रांती व वीरा यांच्यासह नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आल्या होत्या. किल्ल्यातील उपळी बुरुज पाहण्यासाठी गेल्यानंतर त्या तिन्ही मुलांसह सुमारे १०० फूट खोल दरीत पडल्या. घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, ही घटना अपघाती होती की जाणीवपूर्वक उचललेले पाऊल होते, याबाबत पोलीस तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी मुलीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून प्रकरणाचा सर्वांगीण तपास सुरू आहे.
कोण होत्या अश्विनी पौळ
अश्विनी पौळ मूळच्या उमरगा तालुक्यातील व्हंताळ गावच्या असून सध्या त्या लातूर जिल्ह्यातील अंबुलगा (ता. निलंगा) येथे वास्तव्यास होत्या. शालेय जीवनापासूनच त्यांना कुस्तीची विशेष आवड होती आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये त्यांनी अनेक विजय मिळवले होते. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या आणि त्यांचे पती मनोहर पौळ पोलीस भरतीची तयारी करत होते.
अश्विनी यांनी 2007 मध्ये केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक, तर 2008 व 2009 मध्ये पंजाबमधील गुरुदासपूर आणि चेन्नई येथील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. याशिवाय 2010 मध्ये भोपाल, कानपूर आणि हरियाणा, तसंच बालेवाडी (पुणे), कन्याकुमारी आणि सैफई (लखनऊ) येथील राष्ट्रीय स्पर्धा गाजवत संपूर्ण कारकिर्दीत 5 सुवर्ण आणि 6 रौप्य पदकांवर आपलं नाव कोरलं आहे. नक्की वाचा: छत्रपती संभाजीनगरमध्ये मुलाचा आयफोन घेण्याचा हट्ट अख्ख्या कुटुंबाच्या जीवावर बेतला; दरीत कोसळले.
नळदुर्ग पोलिसांनी घटनेचा तपास हाती घेतला असून, कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांची शहानिशा केली जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे अंबुलगा, व्हंताळ आणि परिसरात शोककळा पसरली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 04, 2026 11:18 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

