National Health Mission: राष्ट्रीय आरोग्य मिशन 400 कोटींचा गैरव्यहार; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र
यासाठी सुमारे 300 ते 400 कोटी रुपयांची चौकशी करणे गरजेचे आहे. सेवेत कायम करण्यासाठी सुमारे 400 कोटी रुपयांची उलाढाल महाराष्ट्रात होत असेल तर ते अतीशय गंभीर आहे.
राष्ट्रीय आरोग्य मिशन (National Health Mission) योजना अंमलबजावणीच्या नावाखाली तब्बल 300 ते 400 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी करत फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray यांना एक पत्रही लिहीले आहे. राष्ट्रीय आरोग्य मिशनची अंमलबजावणी करत असताना सेवेत कायम नियुक्त देण्याच्या नावाखाली ही आर्थिक उलाढाल होत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात देवेंद्र फडणीस यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या निधीतून परंतू, राज्य सरकारमार्फत राष्ट्रीय आरोग्य मिशन ही योजना चालवली जाते. त्यामुंळे या योजनेंतर्गत उमेदवारांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया ही राज्य सरकारमार्फत होते. या योजनेत कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्यांना सेवेत कायम नियुक्त्या देण्यासंदर्भात काही मंत्र्यांकडून विधाने करण्यात आली. त्यानंतर कायमस्वरुपी नियुक्त्यांसाठी संपूर्ण राज्यात आर्थिक देवाणघेवाणीला प्रचंड वेग आला आहे. यासंदर्भात दूरद्धनी संवादाच्या तीन ऑडिओ क्लिप माझ्याकडे प्राप्त झाल्या आहेत. त्या या पत्रासोबत जोडत आहे. (हेही वाचा, Devendra Fadnavis Coronavirus Positive: देवेंद्र फडणवीस यांना कोरोना व्हायरस संसर्ग, COVID 19 चाचणी पॉझिटीव्ह)
ऑडिओ क्लिपचा हवाला देत देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, राज्यात सुमारे 20 हजार असे उमेदवार असून, त्यांना सेवेत कायम करण्यासाठी त्यांच्याकडून 1 ते 2.5 लाख रुपये गोळा केले जात आहेत. यासाठी सुमारे 300 ते 400 कोटी रुपयांची चौकशी करणे गरजेचे आहे. सेवेत कायम करण्यासाठी सुमारे 400 कोटी रुपयांची उलाढाल महाराष्ट्रात होत असेल तर ते अतीशय गंभीर आहे.
प्रत्यक्षात उमेदवरांकडून 1 रुपयांचे सहमतीपत्र आणि 500 रुपये लढा निधी असे संकलन करीत अर्जावर स्वाक्षरी घेतली जाते. सोबत 1 ते 2 लाख रुपयांदरम्यान, रोख असलेला लिफाफा वेगळा देण्यास सांगितले जात आहे. ही रोख देताना नाटा या केवळ 500 आणि 2000 रुपयांच्याच असाव्यात असेही सांगितले जाते. या संवादात अनेकांची नावेही आहेत. मात्र ती इथे नमूद करत नाही. सोबतच्या ऑडिओ क्लिपमध्ये ती आपल्याला ऐकू येतील. हा पैसा देण्यासाठी अनेकांनी कर्ज घेतले आणि त्यांनी तो पैसा जमा केला. पण आता त्यांना केवळ व्याज भरावे लागत आहे. काही लोक एकमेकांना बँकेतून पैसे काढून हातावर ठेवा, केव्हाही भरावे लागतील असे सांगत आहेत. या प्रकारासाठी बँक खातीही उघडली गेली आहेत, असे फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, केवळ एका अभियानात सेवेतील कायम नियुक्तीसाठी अशा पद्धतीने 400 कोटींचा भ्रष्टाचार होत असेल तर कोरनाच्याकालखंडात आणि तेही आरोग्य क्षेत्रात किती मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होतो आहे याची कल्पनाही न केलेली बरी. या ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केलीआहे.