WFH and Cyber Crime: 'वर्क फ्रॉम होम' करण्याच्या नादात महिलेला 18 लाख रुपयांचा गंडा, सायबर क्राईम द्वारे फसवणूक
महिलेचे मन त्या जाहीरातीमागे धावले आणि त्या जाहीरातीवरुन तिने संपर्क केला. नोकरीच्या मोहात पडलेल्या महिलेला आपण सायबर गुन्हेगारांच्या ( Cyber Crime) जाळ्यात केव्हा आडकलो कळलेच नाही.
Nashik Cyber: मोबाईलवर सर्फिंग करता करता 'वर्क फ्रॉम होम' (Work From Home) नोकरीच्या प्रेमात पडणाऱ्या महिलेला तब्बल 18 लाख रुपयांना फटका बसला आहे. सदर महिला मोबाईल वर सर्फिंग करत असताना तिला ‘वर्क फ्रॉम होम करा आणि काही दिवसांत लाखो रुपये कमवा’ (WFH) अशी जाहीरात दिसली. महिलेचे मन त्या जाहीरातीमागे धावले आणि त्या जाहीरातीवरुन तिने संपर्क केला. नोकरीच्या मोहात पडलेल्या महिलेला आपण सायबर गुन्हेगारांच्या ( Cyber Crime) जाळ्यात केव्हा आडकलो कळलेच नाही. सायबर गुन्हेगारांनी महिलेला नोकरीसाठी आवश्यक एक फॉर्म ऑनलाईन भरुन देण्यास सांगितला. ज्यात विविध प्रकारच्या प्रश्नावलीचा समावश होता. ही प्रश्नावली भरताना महिलेला विविध बँक खात्यांमध्ये पैसेही भरण्यास सांगण्यात आले. जे महिलेने भरले. या सर्व प्रकारात महिलेची 18 लाख रुपयांची फसवणूक झाली. महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन सायबर पोलिसांनी 24 बँक खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक शहरातील खुटवडनगर येथे हा धक्कादायक प्रकार घडला. प्राप्त माहितीनुसार, पूनम नामक 32 वर्षांची महिला मोबाईलवरुन नोकरी शोधत होती. नोकरीसाठी मोबाईल सर्फ करता करता या महिलेचे लक्ष ‘वर्क फ्रॉम होम करा आणि काही दिवसांत लाखो रुपये कमवा’ या जाहिरातीने वेधून घेतले. तिला ही नोकरी आपल्यासाठी योग्य आहे असे वाटल्याने जाहिरातीवर असलेल्या लिंकवर संपर्क केला. तसेच लिंकवर असलेल्या तांत्रिक बाबींची पूर्तताही केली. दरम्यान, ही प्रश्नावली भरत असताना महिलेच्या फोनवर टेलीग्राम खात्यात रिव्ह्यू पूर्ण केल्याबद्दल काही रक्कम क्रेडीट होत असल्याचे दाखवण्यात आले. ज्यामुळे महिलेचा आत्मविश्वास वाढला आणि तिने पुढेही या तांत्रिक बाबी पूर्ण करणे सुरुच ठेवले. (हेही वाचा, Biggest Cyber Fraud: सायबर भामट्याचा दिल्लीतील डॉक्टरला 4.47 कोटी रुपयांचा गंडा, महाराष्ट्रातील अंमली पदार्थ विभागातील अधिकारी सांगून फसवणूक)
दरम्यान, आरोपींनी महिलेला तिच्या खात्यात पैसे जमा होत असल्याची खात्री पटवून दिली आणि विश्वासात घेतले. दरम्यान, उर्वरीत रिव्ह्यू भरण्यासाठी महिलेला 3 ते 27 मार्च या कालावधीत 24 बँकांच्या खात्यात पैसे भरण्यास सांगितले. आरोपींच्या पूर्ण प्रभावाखाली येत महिलेने विविध बँक खात्यांमध्ये चक्क 18,18,000 हजार रुपये भरले. दरम्यान, रिव्ह्यू भरत असताना शेवटचा प्रश्न नेमका गहाळ गेला जात असे. ज्यामुळे पूनम यांचा रिव्ह्यू अपूर्ण राहात असे. मात्र, त्यांनी जेवढा रिव्ह्यू भरला आहे त्याचे पैसे टेलीग्राम खात्यात पॉइंट्सच्या रुपात जमा होत असल्याचे दाखवले जात असे. त्यामुळे महिलेचा (पूनम) विश्वास वाढला. त्या आपल्याकडील रक्कम भरतच गेल्या.
दरम्यान, रिव्ह्यू भरत असताना टेलीग्राम खात्यात जमा होणाऱ्या पॉइंट्सच्या तुलने बँक खात्यात मात्र रक्कम वाढत नसल्याने पूनम यांना संशयआला. त्यामुळे त्यांनी पैसे का जमा होत नाहीत याचा शोध घेतला असता त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलीसांत तक्रार दिली. सायबर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, येस बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीएफबी आदी बँक खात्यांची माहिती मागवली आहे. ज्यात आरोपींनी महिलेची फसवणूक करुन रक्कम वळती केली होती. पोलीस तपास सुरु आहे. पोलीस आरोपींपर्यंत कधी पोहोचतात याबाबत उत्सुकता आहे.