नाशिक: अवकाळी पाऊस सोबत वीजतोडणीने चिंतेत भर पडल्याने शेतकर्‍याने आत्महत्या केल्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आरोप; उर्जामंत्री नितीन राऊत, महावितरण अधिकारी वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

5 हजार 702 हेक्टर वरील पिके जमिनदोस्त झाली आहेत तर या अवकाळी पावसात 7 हजार 521 शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे.

Image used for representational purpose (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात नाशिक मध्ये एका द्राक्ष बागायतदाराने विष पिऊन आपलं जीवन संपवलं आहे. अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान पाहून या शेतकर्‍याने जीवन संपवण्याचं टोकाचं पाऊल उचललं असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान या बागायतदारांची वीजतोडणी देखील करण्यात आल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उर्जामंत्र्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. ही घटना नाशिक मधील दिंडोरी तालुक्यातील आहे. तर आत्महत्या करणार्‍या बागायतदाराचे नाव बाळासाहेब ठुबे आहे. सप्टेंबर 2020 पर्यंतची वीज मार्च अखेरीपर्यंत भरल्यास शेतकर्‍यांना मिळणार वीजबिलामध्ये 50% सूट.

एबीपी माझा च्या रिपोर्टनुसार, बाळासाहेब ठुबे ने शनिवार (20 मार्च) दिवशी आपल्या द्राक्ष बागेतच विषारी औषध सेवन करत आत्महत्या केली. ठुबे यांनी इतरांकडून पैसे उधारीवर घेऊन द्राक्षाची बाग उभी केली होती. त्यांच्या दीड एकर बागेतील एक एकर द्राक्षांची काढणी बाकी होती.

पण अचानक शनिवारी अवकाळी पाऊस बरसला आणि सार्‍या द्राक्षांचं नुकसान झालं. बागेच्या नुकसानीसोबतच वीजबिलाच्या थकबाकीमुळे त्यांच्या चिंतेमध्ये भर पडली आणि त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या घटनेनंतर ठुबेंच्या आत्महत्येला ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि महावितरण अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याबद्दल त्यांनी वणी पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रारही दाखल केली आहे.

नाशिक मध्ये निफाड, दिंडोरी, मालेगाव आणि बागलाण तालुक्यात मागील काही दिवस गारपीट होत आहे. 5 हजार 702 हेक्टर वरील पिके जमिनदोस्त झाली आहेत तर या अवकाळी पावसात 7 हजार 521 शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे. यामध्ये द्राक्ष आणि कांदा पिकांना यात सर्वाधिक फटका बसला आहे.