नाशिक-पुणे विमान सेवा दिवाळी पासून पुन्हा सूरु होणार; केवळ एका तासात करता येणार प्रवास

मागील तीन वर्षांपासून बंद असणाऱ्या या सेवेला एअर इंडियाची सहयोगी कंपनी अलायन्स एअरने सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

Representational Image (Photo credits: Pixabay, Lars_Nissen_Photoart)

यंदाच्या दिवाळीत (Diwali 2019) लक्ष्मी पूजनाच्या (Lakshmi Pujan) मुहूर्तावर म्हणजेच 27 ऑक्टोबर पासून नाशिक- पुणे विमानसेवा (Nashik- Pune)  पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. मागील तीन वर्षांपासून बंद असणाऱ्या या सेवेला एअर इंडियाची (Air India) उपकंपनी अलायन्स एअरने (Alliance Air) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या विमानाने नाशिक ते पुणे दरम्यानचा पाच तासांचा प्रवास हा केवळ एका तासात पूर्ण करता येणार आहे. आठवड्यातील सहा दिवस (रविवार वगळून) ही सेवा सुरु असणार आहे. यासाठी काहीच दिवसात बुकिंग ला सुरुवात होईल.

याआधी नाशिकहून हैदराबाद (Hyderabad)  व अहमदाबाद (Ahemdabad) या दोन शहरांना जोडणारी विमानसेवा सुरु करण्यात आली होती यापाठोपाठ आता नाशिक ते पुणे अशी विमानसेवा देखील येत्या महिन्याभरात सुरु होईल.

प्राप्त माहितीनुसार, या विमानांची क्षमता 70  जणांच्या आसनाइतकी असणार आहे. उडान योजनेअंतर्गत यातील 50 टक्के जागा या राखीव असतील. या योजनेच्या अंतर्गतच 1620 रूपये तिकिट दर निश्चित करण्यात आले आहे. DCGA मार्फत अलीकडेच या विमानाच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. दररोज दुपारी 3 वाजता विमान नाशिक, ओझर येथून निघून पुढील एक तासात म्हणजेच 4 वाजता पुणे येथे पोहचणार आहे. तर पुण्याहून पुन्हा हेच विमान संध्याकाळी 4.30 वाजता निघून 5.30  च्या सुमारास नाशिक ला पोहचणार आहे.

दरम्यान मागील दोन वर्षांपूर्वी एअर डेक्कन कंपनी मार्फत नाशिक-पुणे विमानसेवा सुरू करण्यात आली होती. या विमांना नागरिकांनी देखील मोठा प्रतिसाद दिला होता. मात्र, अव्यावसायिकरित्या ही सेवा देण्यात आल्याने आर्थिक नुकसानपायी ही सेवा बंद करण्याची वेळ आली होती. यानंतर आता पुन्हा ही सेवा सुरु करण्यात येणार आहे.