नाशिक: ऑनलाईन लॉटरी जिंकण्याच्या नादात 10 लाख रूपये गमावून पोलिसांत खोटी तक्रार

नाशिक मध्ये एका व्यक्तीला ऑनलाईन लॉटरीमध्ये 10 लाखाचे नुकसान झाल्यानंतर त्याने खोटी पोलिस तक्रार दाखल केल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Lottery | Representational Image (Photo Credits: Pixabay)

नाशिक मध्ये एका व्यक्तीला ऑनलाईन लॉटरीमध्ये 10 लाखाचे नुकसान झाल्यानंतर त्याने खोटी पोलिस तक्रार दाखल केल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑनलाईन लॉटरी जिंकण्याच्या मोहात त्याने केलेल्या काही गोष्टींमधून ही फेक फ्रॉड केस समोर आली आहे. असे टाईम्स ऑफ इंडियाचं वृत्त आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 28 मे दिवशी विकी डिंगण या व्यक्तीने पोलिस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली. त्याचा तपास सुरू झाल्यानंतर संबंधित व्यक्तीने ऑनलाईन लॉटरीमध्ये पैसे गमावल्याची बाब समोर आली. पोलिसांकडून त्याची उलट तपासणी करताच त्याने खरा प्रकार सांगितला. विकीच्या वडिलांना बॅंकेचा फारसा ऑनलाईन व्यवहार येत नाही, समज नाही त्यामुळे विकी त्यांच्या बॅंकेचा व्यवहार सांभाळत होता. त्याने ऑनलाईन लॉटरी जिंकण्याच्या प्रयत्नामध्ये सुमारे 10 लाख रूपये उधळले.

विकीचा हा प्रकार जेव्हा त्याच्या वडिलांना समजला तेव्हा त्यांनाही धक्का बसला. अर्धांगवायूचा झटका येऊन त्यांची प्रकृती ढासळली. दरम्यान टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिलेल्या माहितीमध्ये पोलिसांनी आता या अवैधरित्या चालवल्या जाणार्‍या ऑनलाईन लॉटरींना आळा कसा घालायचा यासाठी प्रयत्न करायला हवेत असे सांगितले आहे.

दरम्यान खोटी तक्रार नोंदवल्याप्रकरणी विकीवर कोणताही गुन्हा दाखल न करता त्याला समज देऊन सोडण्यात आलं आहे. बेरोजगार असलेल्या विकीला लॉटरीतून झटपट पैसा मिळवता येईल या आशेतून त्याने नशीब आजमवण्याचा प्रयत्न केला मात्र हा प्रकार त्याच्याच अंगाशी आला.