नाशिक: लग्नाला नकार दिल्याने तिने स्वत:ला पेटवून घेतले; लासलगाव जळीत कांडातील आरोपीचा व्हिडिओ व्हायरल
याप्रकरणी मुख्य संशयित अद्याप फरार असून दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांची कसून चौकशी सुरु आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील लासलगाव (Lasalgaon) येथे घडलेल्या जळीतकांड प्रकरणात आणखी एक नवा मुद्दा समोर आला आहे. या प्रकरणातील पीडिता आपल्याशी विवाह करण्यासाठी वारंवार दबाव टाकत होती. मात्र, आपण तिच्यासोबत विवाह करण्यास नकार दिल्यानेच तिने स्वत:ला पेटवून दिल्याचा दावा या प्रकरणातील आरोपीने केला आहे. आरोपीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हडिओत हा आरोपी हा दावा करताना दिसतो. दरम्यान, रामेश्वर भागवत नावाच्या एका आरोपीला पोलिसांनी तांब्यात घेतले आहे. मात्र, व्हिडिओत दावा करणारा आरोपी हा रामेश्वर भागवत हाच आहे का याबाबत माहिती मिळू शकली नाही. लासलगावमध्ये बसस्थानकाजवळ शनिवारी संध्याकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. याप्रकरणी मुख्य संशयित अद्याप फरार असून दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांची कसून चौकशी सुरु आहे.
लासलगाव प्रकरणातील आरोपीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने वृत्तात दाखवलेल्या व्हिडिओमध्ये आरोपी आपली बाजू मांडताना दिसत होता. आरोपीने म्हटले आहे की, ''आमच्या घराशेजारी राहायची ती. त्याच्यामध्ये घरामध्ये असल्यामुळे माझे आईवडील तिला मदत करत गेले. एक दोन वेळा मदत केले. तिचा नवरा वारला होता. त्यामुळे त्यांनी तिला मदत केली. त्याच्यामध्ये ती मला लग्नासाठी टॉर्चर करायला लागली. मी तिला बोललो मी तुझ्याशी लग्न करु शकत नाही. तुला तीन मुलं आहेत. माझ्या घरच्यांना ते मान्य होणार नाही. मी तिला भरपूर वेळा तिला सांगण्याचा प्रयत्न केला. मी तिला समजून सांगत गेलो. माझ्या घरच्यांना आणि तुझ्याही घरच्यांना ते मान्य होणार नाही. पण, ती मला टॉर्चर करत गेली. काल हे जे जळीत झालं. तिने मला बस स्टॉपवर बोलावले. ती स्वत:हून पेट्रोल घेऊन आली. त्यावेळीही तिने मला विचारले. तू माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही. मी तिला हात जोडून विनंती केली. मी तुझ्याशी लग्न करु शकत नाही. मी तुला हात जोडून विनंती करतो. तू मला गेले तीन महिन्यापासून तेच टॉर्चर करते आहेस. तिने माझी गोष्ट ऐकलीच नाही. ती मला म्हणाली बरं ठिक आहे. मग मी तिथून मित्रासोबत निघालो. इतक्यात तिने स्वत:ने पेट्र्रोल ओतून घेतलं. पेटवून घेतलं. आम्ही ते पाहिलं. आम्ही धावून गेलो. तिला आग लागली होती. आम्ही तिला विझवलं. पूर्ण विझवलं. पण, नंतर मी घाबरलो आणि तिथून बाजूला निघून गेलो.'' (हेही वाचा, हिंगणघाट ची पुनरावृत्ती! नाशिक मध्ये महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतुन जिवंत जाळण्याचा प्रयत्न; अज्ञात आरोपी फरार)
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एका विवाहीत व्यक्तीने शाळेत शिक्षिका असलेल्या तरुणीला तिच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळले. उपचारादरम्यान या तरुणीचा मृत्यू झाला. हे प्रकरण ताजे असतानाच नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बसस्थानक परिसरातही अशाच प्रकारची घटना समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांच्या मागावर आहेत. तर, पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.