Nashik Crime News: नाशिकमध्ये बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तीन जणांना अटक

अंबड पोलिसांनी कारवाई करत तीघांना अटक केली आहे. एक फरार आहे.

Photo Credit -X

Nashik Crime News : नाशिकमध्ये बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा अंबड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. टोळीकडून पाचशे रुपयांच्या बनावट नोटा (Fake Notes) विक्री करणारे रॅकेट उघडकीस आले आहे. पोलिसांना या रॅकेटची माहिती मिळाली होती. त्याआधारे त्यांनी सापळा रचून ही कारवाई केली. याप्रकरणी तिघांना अंबड पोलिसांनी अटक केली आहे. एक जण फरार आहे. फरार आरोपीचा पोलिस सध्या शोध घेत आहेत.

सापळा रचून कारवाई

अशोक पगार (45, मु. पो. मेंढी ता. सिन्नर जि. नाशिक) हा नकली नोटा चलनात आणणाऱ्या टोळीच्या मोहक्याच नाव आहे. पोलीस अंमलदार संदीप भुरे यांना या टोळीच्या कामांविषयी गुप्त माहिती मिळाली होती. त्याआधारे त्यांनी इतर सहकऱ्यांच्या सहाय्याने सापळा रचला आणि माऊली लॉन्स येथे कारवाई केली.

पाचशे रुपयाच्या नोटा आढळल्या

पगारे हा माऊली लॉन्स येथे आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्याकडे पाचशे रुपये किमतीच्या बनावट तीस नोटा आढळल्या. यावरून पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी केली असता या गुन्ह्यात हेमंत कोल्हे, नंदकुमार मुरकुटे व भानुदास वाघ यांनी सिन्नर (Sinnar) येथील एका हॉटेलमध्ये बनावट नोटा बनवल्याचे सांगितले.