नरेंद्र मोदी, राजनाथ सिंग, देवेंद्र फडणवीस यांच्या कडून गडचिरोली येथील नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा निषेध
महाराष्ट्र दिनी गडचिरोली येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे.
महाराष्ट्र दिनी गडचिरोली येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग (Rajnath Singh), पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी निषेध केला आहे. या हल्ल्यात 10 जवान जखमी झाले आहेत. तसंच 15 जवान शहीद झाले असून या स्फोटात एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. ट्विट करत मुख्यमंत्र्यापासून पंतप्रधानांपर्यंत सर्वांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. (गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून IED स्फोट)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट:
महाराष्ट्रातील गडचिरोतील सुरक्षा रक्षकांवर झालेल्या हल्ल्याबद्दल संवेदना व्यक्त करत मोदींनी त्यांच्या शौर्याला सलाम केला आहे. त्यांचे बलिदान कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या कुटुंबाबद्दल संवेदना व्यक्त करत मोदींनी असा हिंसाचार करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असे म्हटले आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांचे ट्विट:
गडचिरोलीत पोलिसांवर झालेला हल्ला भीती आणि निराशादायक आहे. पोलिस कर्मचाऱ्यांच्या शौर्याबद्दल आम्हाला अत्यंत अभिमान आहे. देशाची सेवा करताना त्यांनी दिलेले सर्वोच्च बलिदान व्यर्थ ठरणार नाही. तसंच त्यांनी शहीदांच्या कुटुंबियांबद्दल राजनाथ सिंग यांनी संवेदना व्यक्त केली आहे.
त्याचबरोबर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, या हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्याशी बोलणे झाले असून राज्य सरकारला हवी असलेली सर्व मदत आमच्याकडून करण्यात येत आहे. गृहमंत्रालय राज्य सरकारच्या सातत्याने संपर्कात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट:
गडचिरोली येथील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सुरक्षा रक्षकांबद्दल आणि कुटुंबियांबद्दल मुख्यमंत्र्यांनी संवेदना व्यक्त केली आहे. पोलिस महानिरीक्षक आणि गडचिरोली पोलिसांशी मी संपर्कात असल्याचे त्यांनी ट्विट करुन सांगितले.
काल मध्यरात्रीपासूनच नक्षलींनी गडचिरोलीतील कुरखेडा भागीतील रस्त्याच्या कामावरील तब्बल 27 वाहनं पेटवून देत हल्ल्याला सुरुवात केली होती. कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे नक्षल्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील तब्बल वाहने, यंत्रसामग्री आणि कार्यालये पेटून दिली. यात दोन जेसीबी, 11 टिप्पर, डिझेल आणि पेट्रोल टँकर्स, रोलर्स, जेनरेटर व्हॅन यांचा समावेश होता.