Narayan Rane Arrest Case: नारायण राणे यांच्या जीवाला धोका; भाजप नेते प्रसाद लाड यांचा आरोप
कोणत्याही प्रकारे सहकार्य करत नसल्याचा आरोप करत प्रसाद लाड यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यातच धरणे आंदोलन सरु केल्याची माहिती आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) जेवण करत असताना पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली. या घटनेचे माझ्याकडे व्हिडिओ फुटेज आहे, असा खळबळजनक दावा भाजप (BJP) आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केला आहे. नारायण राणे यांना पोलिसंनी ताब्यात घेतले आहे. परंतू, अधिकृतरित्या अटक दाखवली नाही. त्यामुळे सायंकाळी सहा वाजेपर्यंत ताब्यात ठेवायचे त्यानंतर अटक दाखवायची आणि रात्री तुरुंगात त्यांचा छळवाद करायचा असा पोलिसांचा डाव आहे. त्यामुळे राणे यांच्या जीवाताला धोका आहे, असेही भाजप आमदार प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.
प्रसाद लाड यांचे पोलीस स्टेशनमध्ये धरणे
नारायण राणे यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस काहीही माहिती देत नाहीत. कोणत्याही प्रकारे सहकार्य करत नसल्याचा आरोप करत प्रसाद लाड यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यातच धरणे आंदोलन सरु केल्याची माहिती आहे. (हेही वाचा, Narayan Rane Arrested: मोदी मंत्रिमंडळातील मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक)
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. नारायण राणे यांचा जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर राणे यांनी मुंबई उच्च न्यायालात धाव घेतली. परंतू, मुंबई उच्च न्यायालयानेही राणे यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यानंतर राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम होती. राणे यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचे एक पथक चिपळूण ला रवाना झाले होते. दरम्यान, रत्नागिरी पोलिसांनी राणे यांना ताब्यात घेतले. कायदेशीर कारवाई पूर्ण केल्यानंतर त्यांना नाशिक पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार, असल्याची माहिती आहे.