Jat Panchayat: सासऱ्याचा प्रेमविवाह; सून, नातवंडे जातीतून बहिष्कृत; जातपंचायतीचा मनमानी निर्णय

या प्रकरणी पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Jat Panchayat FIR | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

विज्ञानवाद आणि आधुनिकतेच्या कितीही गप्पा मारल्या तरी, आजही आपली समाजव्यवस्था जातीच्या उतरंडीतून बाहेर आली नाही. ही जातव्यवस्था इतकी घट्ट आणि तळागाळात रुतली आहे की, त्याचा आजही सर्वसामान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात असलेल्या नंदीवाले म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिरमले (Nandiwale Tirmali Community) समाजातील एक महिला आणि तिच्या मुलांना असाच त्रास सहन करवा लागत आहे. या महिलेच्या सासऱ्याने प्रेमविवाह (Father-in-law Love Marriage) केला आहे. यावरुन या कुटुंबास पुढच्या सात पिढ्यांपर्यंत जातीतून बहिष्कृत करण्याचा धक्कादायक आणि मनमानी निर्णय तिरमले जात पंचायत (Caste Panchayat) द्वारे घेण्यात आला आहे. या धक्कादायक प्रकारानंतर नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्या आला आहे.

सात पिढ्या वाळीत

तिरमले जात पंचायत चालवणारे पंच आणि समाजातील इतर काही घटकांविरोधात आष्टी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार प्राप्त झाली आहे. ज्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या समाजातील नरसू फुलमाळी या ग्रहस्थांचा काही दिवसांपूर्वीच प्रेमविवाह झाला आहे. या विवाहावर जातपंचायतीने आक्षेप घेत परवानगी नाकारली. तरीही नरसू यांनी जातपंचायतीला न जुमानता आपल्या निर्णयावर ठाम राहात विवाह केलाच. त्याची परिणीती त्यांची सून आणि नातवंडे यांना समाजाकडून त्रास होण्यात झाली. इतकेच नव्हे तर नरसू फुलमाळी आणि त्यांच्या कुटुंबीयांना पुढच्या सात जन्मापर्यंत जातीतून बहिष्कृत करण्याचा घृणास्पद निर्णय जातपंचायतीने घेतला.  (हेही वाचा, Inter-Caste Marriage: आंतरजातीय विवाहामुळे नंदीवाले समाजातील 150 कुटुंबांवर बहिष्कार; पंचांविरुद्ध गुन्हे दाखल)

सासऱ्याचा दंड सुनेला भरण्याचे आदेश

धक्कादायक म्हणजे नरसू फुलमाळी यांनी प्रेमविवाह केल्याने जातपंंचायतीने त्यांना अडिच लाख रुपये इतका दंड ठोठावला. हा दंड भरण्यास नरसू यांनी नकार दिला. परिणामी जातपंचायतीमध्ये असलेले पंच गंगाधर बाबू पालवे, उत्तम हरिभाऊ फुलमाळी, गंगा गंगाराम फुलमाळी, चिन्नू साहेबराव फुलमाळी, सुभाष फुलमाळी, बाबूराव साहेबराव फुलमाळी शेटीबा रामा काकडे, सयाजी सायबा फुलमाळी, गुलाब पालवे या नऊ जणांनी आपला मोर्चा नरसू यांच्या सूनेकडे (Daughter-in-law) वळवला. सासऱ्याला झालेला दंड त्यांनी भरला नाही तर तो आता तुम्ही भरा असे आदेशच त्यांनी सून मालन शिवाजी फुलमाळी यांना दिला. यावर इतके पैसे आपल्याकडे नाहीत, असे उत्तर मालन यानी दिले. त्यावर हा दंड तुम्हाला भरावाच लागेल. अन्यथा तुमच्या पुढच्या सात पिढ्या जातीतून बहिष्कृत केल्या जातील, वाळीत टाकल्या जातील, असा निर्णय पंचानी दिला. (हेही वाचा, Gaud Saraswat Brahmin Community: पोटजातीत लग्न केल्याने कुटुंबाला 23 वर्षे टाकले वाळीत, पुणे येथील श्रीगौड ब्राम्हण समाज जातपंचायतीचे धक्कादायक कृत्य)

बहिष्काराचे स्वरुप

मालन यांनी जातपंचायतीच्या पंचाना कोणताही विरोध केला नाही. मात्र, पुढे त्यांनी थेट आष्टी पोलीस स्टेशन गाठले आणि थेट जातपंचायतीविरोधातच गुन्हा दाखल केला. प्राप्त तक्रारीनुसार नऊ जनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, 22 सप्टेंबरच्या सकाळी ही जातपंचायत आष्टी तालुक्यातील डाईठाण येथील तिरमली वस्ती येथे आयोजित करण्यात आली होती. या पंचायतीस अनेक लोक उपस्थित होते, असेही मालन यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, ‘महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण (प्रतिबंध, बंदी व निवारण) अधिनियम, २०१६’च्या कलमाअंतर्गत तसेच ‘भारतीय न्याय संहिते’च्या (बीएनएस) विविध कलमान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास सुरु आहे. या प्रकरणात अद्यापही कोणाला अटक करण्यात आले नाही.



संबंधित बातम्या