नाना पटोले दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या भेटीला जाणार; महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या हालचालींना वेग
आज नाना पटोले दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन प्रदेशाध्यक्ष पदासाठी होणाऱ्या विलंबासंदर्भात चर्चा करणार आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात चर्चा रंगल्या आहेत. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचं नाव प्रदेशाध्यपदासाठी चर्चेत आहे. मात्र, अद्याप त्यांच्या नावावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब करण्यात आलेलं नाही. आज नाना पटोले दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना भेटणार आहेत. त्यामुळे आज नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून भिजत घोंगड पडलं आहे. प्रदेशाध्यक्ष पदासाठी होण्याऱ्या विलंबानंतर सध्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नाराजीही व्यक्त केली आहे. (वाचा - Nilesh Rane criticizes Sanjay Raut: संजय राऊत एक नंबर ढोंगी आहेत; शेतकरी आंदोलनाला दिलेल्या भेटीवरुन निलेश राणे यांची टीका)
दरम्यान, आज नाना पटोले दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन प्रदेशाध्यक्ष पदासाठी होणाऱ्या विलंबासंदर्भात चर्चा करणार आहेत. काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष निवडण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी दिल्लीत काँग्रेस मंत्र्यांची आणि महत्त्वाच्या नेत्यांची बैठक आयोजित केली होती. परंतु, या बैठकीत काहीही निष्पन्न झालं नाही.
नाना पटोले हे राज्यातील एक आक्रमक तसेच ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करणार नेत आहेत. काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद विदर्भातील मंत्र्याला मिळावं, अशी मागणी काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी केली होती.