Nagpur Traffic Police: लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल, थेट निलंबन
महिला दुचाकी चालकाने संबंधित वाहतूक पोलिसावर लाचखोरीचा आरोप केल्यानंतर ही कारवाई करण्यातआली. आरोपीने महिलेकडून लाच घेतल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नागपूर वाहतूक पोलिसांतील (Nagpur Traffic Police) एका कर्मचाऱ्याला निलंबीत करण्यात आल्याचे वृत्त वृत्तसंस्था आयएनएसने दिले आहे. महिला दुचाकी चालकाने संबंधित वाहतूक पोलिसावर लाचखोरीचा आरोप केल्यानंतर ही कारवाई करण्यातआली. आरोपीने महिलेकडून लाच घेतल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारानंतर या कर्मचाऱ्यास निलंबीत केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. केवळ 300 रुपयांची लाच पोलिस कर्मचाऱ्यास महागात पडली. त्याच्यावर नोकरी गमावण्याची वेळ आली, अशी चर्चा या घटनेनंतर रंगली आहे.
नागपूर येथील अजनी येथील परिसरातील तुकडोजी चौकात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने वाहतूक नियमानूसार हेल्मेट न घातलेल्या महिलेला आणि एका दुचाकीस्वाराला अटक केली. किशोर दुखंडे असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. महिलेने दावा केला आहे की, दुखंडे यांनी महिलेला सोडण्यासाठी 1,000 रुपयांची मागणी केली आणि स्कूटरचा नोंदणी क्रमांक लिहून ठेऊन 'चलान' काटण्याची धमकी दिली.
ट्विट
पोलीस कर्मचारी आणि महिला यांच्यात वाद निर्माण झाला. शेवटी महिलेने हार पत्करली आणि तिच्या साथीदाराला 300 रुपयांची लाचेची रक्कम पोलिसाला सुपूर्द करण्यास सांगितले. दरम्यान, जवळच असलेल्या काही अज्ञात व्यक्तीने हा संपूर्ण भाग मोबाईलवर शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला. तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर नागपूर पोलिसांनी दुखंडे यांना निलंबित करून त्यांच्याविरोधात चौकशी सुरू केली आहे.