Nagpur Suicide Case: नागपूर मध्ये IAS, IPS अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ न शकल्याने 25 वर्षीय मुलाची आत्महत्या

सेंट्रल एव्हेन्यूवरील हॉटेल मध्ये 25 वर्षीय शुभम सिद्धार्थ कांबळे ने आपलं जीवन संपवलं आहे.

Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

नागपूर मध्ये गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकाने आयुष्यात अपेक्षित लक्ष्य गाठू न शकल्याने आत्महत्या करत जीवन संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. स्पर्धा परीक्षा देऊन IAS, IPS अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ न शकल्याने अन्न व औषधी प्रशासन विभागातील एका निरीक्षकाने आत्महत्या केली आहे. मृत अधिकारी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील रहिवासी होता. त्याचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत आढळला आहे. सेंट्रल एव्हेन्यूवरील हॉटेल मध्ये 25 वर्षीय शुभम सिद्धार्थ कांबळे ने आपलं जीवन संपवलं आहे.

आत्महत्येपूर्वी शुभमने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. 'मी स्वत: आत्महत्या करीत आहे. माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही. मी आयएएस, आयपीएस होऊ शकलो नाही. याची मला खंत आहे', असे चिठ्ठीत लिहिले आहे. शुभम खोलीतून बाहेर न पडल्याने त्याची विचारपूस करायला कर्मचारी खोलीत पोहचल्यानंतर आतून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याचं पाहून दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा त्याच्या मृतदेहाच्या शेजारी विषारी द्रव्याच्या 5 बाटल्या सापडल्या.

27  नोव्हेंबरला शुभमसाठी हॉटेलच्या लाईन वर फोन आला होता. त्याला कनेक्ट करून देण्यासाठी मॅनेजरने रूमबॉयला  वर पाठवले पण खोलीतून प्रतिसाद न आल्याने दरवाजा तोडल्यानंतर आत्महत्येचा हा प्रकार समोर आला आहे. नक्की वाचा: Agniveer Death in Mumbai: अग्निवीरसाठी नौदलात प्रशिक्षण घेत असलेल्या 20 वर्षीय तरुणीची आत्महत्या,मालवणी पोलिसांकडून तपास सुरु .

गणेशपेठ पोलिसांनी शुभमच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह मेयो हॉस्पिटलमध्ये पाठवला. तेथेच त्याला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांकडून विषारी द्रव्यांच्या बाटल्यांमध्ये काय होतं याचा देखील तपास केला जाणार आहे.