Free Fire ऑनलाईन गेमच्या नादात नागपूर मधून 3 किशोरवयीन मुलांचे पलायन; पोलिसांनी घेतलं शिताफीने ताब्यात

दरम्यान या मुलांना नागपूरच्या प्रतापनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रविवारी त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Representational Image | (Photo Credits: File Photo)

आजची तरूण पिढी सोशल मीडीया आणि इंटरनेटच्या गर्तेमध्ये पार अडकली आहे. यामध्ये अनेकांना ऑनलाईन गेम्सचं (Online Game) व्यसनच जडलं आहे. पूर्वी पबजी खेळापायी अनेकांनी टोकाची पावलं उचललेली पहायला मिळाली आहेत. यामध्ये आता फ्री फायर (Free Fire) या मोबाईल गेमच्या वेडापायी घरातून 3 किशोरवयीन मुलं पळून गेल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान या मुलांना नागपूरच्या प्रतापनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रविवारी त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

शनिवार 13 फेब्रुवारी दिवशी प्रताप नगर भागात राहणारी 16 वर्षांची 3 मुलं घरातून पळाली. रेल्वे मध्ये बसून ते मुंबईकडे आले. अचानक घरातून मुलं गायब झाल्याने त्यांच्या पालकांमध्येही भीती निर्माण झाली. त्यांनी प्रतापनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली. पोलिसांनी यावेळेस अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी स्टेजनवरील सीसीटीव्ही फूटेज तपासले आणि पुढील प्रकार समजला. या तिन्ही मुलांनी मुंबईकडे जाणारी रेल्वे पकडल्याची पहायला मिळालं.नक्की वाचा: धक्कादायक! मोबाईल गेमचे आमिष दाखवत एका तरूणाकडून 6 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार.

नागपूर पोलिसांनी भुसावळ, नाशिक आणि मुंबई लोहमार्ग पोलिस व रेल्वे सुरक्षा दलातील अधिकार्‍यांना या मुलांची माहिती दिली त्यानंतर शनिवारी नाशिक मध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी या घरातून पळालेल्या मुलांना ताब्यात घेतले. दरम्यान नाशिकमध्ये मुलांचा तपास लागल्यानंतर त्यांना घेऊन येण्यासाठी पोलिस, मुलांचे नातेवाईक रवाना झाले. दरम्यान आता ही तिन्ही मुलं सुखरूप असून घरी परतली आहेत.