मुंबईची शान CSMT परिसर होणार फेरीवाले, भिकारी आणि गर्दुलेमुक्त; 1 मे पासून नियम लागू

आता 1 मे पासून या परिसरात एक मोठा बदल होणार आहे, महाराष्ट्र दिनापासून हे स्थानक ‘No Beggar- No Hawker' म्हणून घोषित करण्यात येणार आहे.

File image of Mumbai's CSMT area | (Photo Credits: PTI)

छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), महाराष्ट्रातील एक महत्वाचे रेल्वे स्थानक तसेच मध्य रेल्वेचे मुख्यालय. ही इमारत फक्त रेल्वेमुळेच महत्वाची नाही, तर यूनेस्को जागतिक वारसा इमारत (UNESCO World Heritage Site) देखील आहे. मुंबईमधील या स्थानकाजवळील परिसर नेहमीच गजबजलेला असतो. आता 1 मे पासून या परिसरात एक मोठा बदल होणार आहे, महाराष्ट्र दिनापासून हे स्थानक ‘No Beggar- No Hawker' म्हणून घोषित करण्यात येणार आहे. म्हणजेच 1 मे पासून या स्थानकात भिकारी आणि फेरीवाले यांना परवानगी असणार नाही.

मध्य रेल्वेकडून देशात आदर्श रेल्वे स्थानके निर्माण करण्याची मोहीम राबवली जात आहे. या अंतर्गत 1 मे पासून, सीएसएमटी हे स्थानक No Hawking, No Crime आणि No Begging स्थानक म्हणून घोषित करण्यात येणार आहे. यासाठी 24×7 काम करणारी विशेष अधिकाऱ्यांची एक टीम तयार केली गेली आहे, जी स्टेशनच्या परिसरात सीसीटीव्हीद्वारे देखरेख ठेवेल. ही टीम सध्या वेशात असणार आहे, जेणेकरून अंमली पदार्थांचे सेवन करणारे लॉक, पाकीटमार, चोर तसेच इतर गुन्हेगारांवर लक्ष ठेवणे सोपे जाईल. (हेही वाचा: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! भारतीय रेल्वे आता वेळेवर धावणार)

या मोहिमे अंतर्गत आता रेल्वेचा दरवाजा मुद्दाम अडवून ठेवणे, जागेसाठी भांडण करणे, सहप्रवाश्याला मारहाण अथवा शिवीगाळ करणे, स्त्रियांसाठी आणि अपंगांसाठी राखीव असणाऱ्या डब्ब्यांमध्ये अतिक्रमण करणे असे प्रकार थांबवण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच स्थानकाच्या परिसरातील सर्व फेरीवाले हटवले जाणार आहेत.