मुंबई: राज्यात झालेल्या पावसामुळे नागरिकांना दिलासा, पाणीसाठ्यात आश्वासक वाढ

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या पाणी साठ्यात कालच्या पावसानानंतर आश्वासक वाढ झाली आहे, येत्या दिवसात पावसाचा जोर कायम राहिल्यास यंदा मुंबईकरांना पाण्याच्या टंचाईपासून मुक्ती मिळू शकते.

Dam | Image used for representational purpose | (Photo Credits: ANI Twitter)

मुंबई व उपनगरात शुक्रवार पासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे आता मुंबईकरांवरील पाणी टंचाईचं संकट टळण्याची चिन्हे दिसत आहेत. माध्यमांच्या माहितीनुसार आता मुंबईच्या आटत चाललेल्या पाणीसाठ्यात कालच्या पावसानानंतर आश्वासक वाढ झाल्याचे समोर येत आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये काल पर्यंत 4.91 टक्के पाणी साठा शिल्लक होता मात्र आज यामध्ये किंचित वाढ होऊन 5.31 टक्के इतका साठा तयार झाला आहे. आकडेवारी पाहता ही वाढ अगदीच शुल्लक असली तरी आश्वासक असल्याचे सांगण्यात येतेय, अशाच प्रकारे पावसाचा जोर कायम राहिल्यास यंदा मुंबईवरील पाणी कपातचे संकट नक्कीच दूर होईल असा विश्वास पालिकेतर्फे दर्शवला जात आहे.

प्राप्त माहितीनुसार काल झालेला पाऊस हा अधिकतः जमिनीत मुरला असल्याने आता पाणीसाठ्यात कमी टक्क्याने वाढ झाली आहे मात्र आजपासून येणार पाऊस हा थेट पाणी साठ्यात जमा होणार आहे असा अंदाज वर्तवला जातोय. दरम्यान, मुंबईकरांना पुरेसे पाणी मिळण्यासाठी पालिकेने राज्य सरकारकडून भातसा आणि अप्पर वैतरणातील पाण्याच्या राखीव साठ्याचा वापर करण्याची परवानगी घेतली होती ,त्यामुळे मुंबईकरांना जुलैपर्यंत पुरेसा पाणीपुरवठा करण्यात कोणतीही अडचण येणार नाही असेही पालिकेने स्पष्ट केले होते. मात्र त्याबरोबरच पालिकेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले होते. काल झालेल्या पावसानंतर मात्र आता पाणीसाठ्यात वाढ होण्याची सुचिन्हे दिसत आहेत.

मुंबईला पाणी पुरवणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, विहार, तुळशी, भातसा तसेच मध्य वैतरणा या धरणांमधून पाणीकपातीमुळे दरदिवशी 3 हजार 515 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. सर्व धरणांमध्ये 1 ऑक्टोबर रोजी 14 लाख 50 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा असल्यास वर्षभर विनाकपात पुरवठा करणे पालिकेला शक्य होते. मागील वर्षी अपुऱ्या पावसामुळे तलावांमध्ये 10 टक्के साठा कमी झाल्याने वर्षभर 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती.