Mumbai Water Cut Update: मुंबई वरील 15% पाणी कपातीचं संकट 30 एप्रिल ऐवजी आता 23 एप्रिललाच टळणार

मुंबई महानगरचा पाणीपुरवठा रविवार 23 एप्रिल पासून पूर्ववत करण्याचा मानस जल अभियंता विभागाचा आहे.

Water Cut | Representational Image (Photo Credits: Pixabay)

मुंबई (Mumbai)  मध्ये पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिनीचे  पंक्चर दूर करण्यासाठी एप्रिल महिना अखेरीपर्यंत 15% पाणीकपातीची घोषणा करण्यात आली होती. परंतू हे काम वेळेआधीच पूर्ण झाल्याने पाणीकपात रद करण्यात आली आहे. अवघ्या 18 दिवसामध्ये हे काम पूर्ण झाल्याने आता 23 एप्रिलपासून शहराचा पाणीपुरवठा पुर्ववत केला जाणार आहे. दरम्यान भांडुप संकुलापर्यंत पाणी वाहून आणणाऱ्या जलबोगद्यातून ठाणे येथे होणाऱ्या गळतीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. बीएमसी च्या माहितीनुसार, भांडुप वॉटर कॉम्प्लेक्स मध्ये मुंबईला पाणी पुरवठा होणारा 65% साठा आहे.

लोकसत्ताच्या वृत्तानुसार, जलवाहिनीच्या दुरूस्तीचं काम पूर्ण झालं आहे. आता जल बोगदा पूर्ण क्षमतेने काम करण्यासाठी सज्ज आहे. हा जलबोगदा आता पाण्याने भरून घेण्यासाठी अतिरिक्त पाणी आवश्यक आहे. अतिरिक्त पाण्याची पूर्तता करण्यासाठी सध्याच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नाही. याची काळजी घेतली आहे. त्यामुळे अजून 3-4 दिवसांचा वेळ घेऊन बोगदा पूर्ण भरून मुंबई महानगरचा पाणीपुरवठा रविवार 23 एप्रिल पासून पूर्ववत करण्याचा मानस जल अभियंता विभागाचा आहे.

पहा बीएमसी ट्वीट

मुंबई शहरामध्ये भांडूप संकुल येथील जलशुध्दीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणाऱ्या 5500 मिलीमीटर व्यासाच्या जलबोगद्याला ठाणे येथील बोअरवेल खोदकामाच्या वेळेस धक्का बसल्याने ती पंक्चर झाली होती. यामुळे पाणी गळती सुरू झाली होती. बीएमसीने ही पाणीगळती रोखण्यासाठी दुरुस्तीचं काम हाती घेत जलबोगदा 31 मार्चपासून बंद केला होता. पुढील 30 दिवस या कामासाठी पाणी कपात जाहीर करण्यात आली होती.