मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक निकाल: आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेची जोरदार मुसंडी
ज्यामध्ये आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या युवासेना (UBT) ने अभाविपवर (ABVP) जोरदार विजय मिळवला आहे.
Mumbai University Senate Election Result: मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक निकाल जाहीर झाला आहे. हाती आलेल्या निकालानुसार शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या युवासेना गटाने जोरदार मुसंडी मारली आहे. ओबीसी प्रवर्गातून उमेदवारी दाखल केलेल्या मयूर पांचाळ यांनी ठाकरे गटाला विजयाचा पहिला गुलाल मिळवून दिला. त्यांनी 350 मते मिळवत आघाडी घेतली आहे. दरम्यान, मतमोजणी सुरुच असून ती अंतिम टप्प्यामध्ये आहे. ती जसजशी पुढे सरकेल तसतसा उर्वरित निकाल जाहीर होत राहणार आहे.
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक निकाल जाहीर होण्यास सुरुवात
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक सुरुवातीपासूनच चर्चेत होती. मुदत संपल्यापासून ही निवडणूक सातत्याने पुढे ढकलण्यावर प्रशासन आणि राज्य सरकारचा प्रयत्न होता. ज्यामुळे हे प्रकरण अखेर कोर्टात दाखल झाले. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अखेर ही निवडणूक होऊ घातली. परिणामी मंगळवारी म्हणजेच 24 सप्टेंबर 2024 रोजी प्रत्यक्ष मतदान पार पडले. मतदान पार पडल्यानंतर मतमोजणीसाठी आजचा म्हणजे 27 सप्टेंबर 2024 हा दिवस निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार आज सकाळीच मतमोजणीस सुरवात झाली. मतमोजणी जवळपास पूर्ण होत आल्याने आणि शेवटच्या काही अंतिम फेऱ्या बाकी असताना निकाल जाहीर होत आहे. ज्या प्रभागाची मतमोजणी पूर्ण त्यांचे निकाल जाहीर केले जात आहेत. (हेही वाचा, मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक; 10 जागा, 28 उमेदवार रिंगणात; युवासेना (UBT) विरुद्ध अभाविप यांच्यात थेट सामना)
मुंबई विद्यापीठाच्या 10 नोंदणीकृत जागांसाठी ही निवडणूक पार पडत आहे. त्यासाठी 28 उमेदवार रिंगणात आहेत. अनेक उमेदवार मैदानात असले तरी, प्रत्यक्ष लढत मात्र शिवसेना (UBT) पक्षाची आदित्य ठाकरे यांचा वरचष्मा असलेली युवासेना आणि भाजपची अभाविप यांच्यात होताना दिसत आहे.
युवासेना (UBT) पाच उमेदवार विजयी
दरम्यान, वरुण सरदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, युवासेनेचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत. थोड्याच वेळात संपूर्ण निकाल जाहीर करण्यात येईल. ओबीसी गटातून विजयी उमेदवार खालील प्रमाणे:
- मयूर पांचाळ (ओबीसी गट)
- धनराज कोचाडे (एससी गट)
- स्नेहा गवळी (महिला गट)
- शितल शेठ (एसटी गट)
- शशिकांत खोरे (एनटी गट)
वरीलपैकी पाचही उमेदवारांनी जवळपास 5 हजा गटाने आघाडी घेतली आहे. अभाविपला 800 ते 1000 मते मिळाली आहेत. (हेही वाचा, Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकाच्या तारखा पुढे ढकलल्या, जाणून घ्या मतदान कधी)
मुंबई युनिव्हर्सिटी सिनेट निवडणूक 2024 तपशील
- एकूण जागा: 10
- एकूण उमेदवार: 28
- एकूण मतदारसंख्या: 13,406
- परिक्षेत्रातील एकूण मतदान केंद्रे: 38
- मतदान केंद्रांवरील एकूण बूथसंख्या: 64
- अधिकृत संकेतस्थळ: केंद्रनिहाय आणि बूथनिहाय मतदार यादी पाहण्यासाठी https://mu.eduapp.co.in या संकेतस्थळाला भेट द्या.
मुंबई विद्यापीठाच्या 10 नोंदणीकृत पदवीधारकांच्या जागांकरिता मंगळवारी 24 सप्टेंबर 2024 रोजी मतदान पार पडले होते. सध्या निवडणुकांच्या मतमोजणी सुरु आहे. या 10 जागांवरील निवडणुकीसाठी एकूण 28 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाची युवासेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात थेट लढत होत आहे. राज ठाकरे यांच्या मनसे (MNS) कडून केवळ एक उमेदवार रिंगणात आहे. तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून एकही उमेदवार रिंगणात नाही.