मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन सत्र परीक्षांचे स्वरुप जाहीर; कोणत्या शाखेसाठी कशी असेल प्रश्नपत्रिका? जाणून घ्या

परीक्षांच्या स्वरुपाबाबत विद्यापीठाकडून पत्रक जाहीर करुन माहिती देण्यात आली आहे.

Mumbai University (Photo Credits- Facebook)

कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांच्या सत्र परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहेत. या परीक्षांचे स्वरुप जाहीर करण्यात आले असून मुंबई विद्यापीठाने बुधवारी एक पत्रक जारी करत यासंदर्भातील माहिती महाविद्यालयांना दिली आहे. प्रोफेशनल कोर्सेसच्या सत्र परीक्षांमध्ये (Semester Exam) मल्टिपल चॉईस क्वेशन्स (Multiple Choice Questions) आणि सविस्तर उत्तरांचे प्रश्न (Descriptive Questions) विचारण्यात येणार आहेत. तर कला (Arts), वाणिज्य (Commerce) आणि विज्ञान (Science) शाखांच्या परीक्षांमध्ये केवळ MCQ प्रश्न विचारले जातील. कला, वाणिज्य, विज्ञान आणि मॅनेजमेंट शाखांच्या परीक्षा घेण्यासाठी अंतिम तारीख 31 डिसेंबर ठरवण्यात आली आहे. तर इंजिनियरिंग, लॉ आणि फार्मासीच्या परीक्षा घेण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी असणार आहे.

कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांच्या प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांना 60 गुणांचा पेपर द्यावा लागणार आहे. त्यातील 50 पैकी 40 प्रश्न एका तासाच्या आत सोडवायचे आहेत. प्रोफेशनल कोर्सेसच्या पेपरमध्ये सविस्तर उत्तरांचे प्रश्न सुद्धा असतील. सर्व प्रोफेशनल कोर्सेसच्या प्रश्नप्रत्रिकेत 50% प्रश्न हे सविस्तर उत्तरं लिहिण्याचे असतील. लॉ आणि आर्किटेक्चर क्षेत्रांच्या परीक्षांसाठी दीड तासांचा कालावधी देण्यात आला आहे. तर इंजिनियरिंग आणि फार्मासीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन तासांचा कालावधी देण्यात येणार आहे.

दरम्यान, या परीक्षा ऑनलाईन होणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे. परंतु, उत्तरं पेपरवर लिहायची की स्क्रिनवर टाईप करण्याची याबद्दल स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. मात्र पेपरवरच उत्तर लिहून सॉफ्टवेअरवर अपलोड करण्यास विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून सांगण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. शिक्षकांना उत्तर प्रत्रिकांचा अॅक्सेस केवळ महाविद्यालयातील कॅम्प्युटर लॅबमधूनच घेता येणार आहे. (मुंबई विद्यापीठाच्या सत्र परीक्षाही ऑनलाईन; स्वरूपात बदल करण्याबाबत विचार सुरु)

तोंडी परीक्षा, प्रॉक्टिकल्स या 10 डिसेंबरपासून ऑनलाईन घेण्यात याव्यात यासाठी गुगल मीट, स्काईप, झुम किंवा फोनचा वापर करावा. या परीक्षांचे गुण विद्यापीठाला 24 डिसेंबरपर्यंत पाठवण्यात यावेत, असेही पत्रकात म्हटले आहे.

पत्रकातील माहितीनुसार, सर्व परीक्षा या महाविद्यालयीन पातळीवर घेण्यात येतील. त्याचप्रमाणे परीक्षांमध्ये विचारले जाणारे सर्व प्रश्न, त्यांना देण्यात आलेले गुण याची पडताळणी मुख्य महाविद्यालयातून करण्यात येईल. तसंच सर्व प्रश्न अभ्यासक्रमातूनच विचारले जातील.

पोस्ट ग्रॅज्युएशनची प्रवेश प्रक्रिया पूर्णरित्या संपली नसल्यामुळे त्या परीक्षांचे वेळापत्रक वेगळ्या पत्रकात जाहीर करण्यात येतील. त्याचप्रमाणे प्रोफेशनल कोर्सेसच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षांचे वेळापत्रकही नंतर जाहीर करण्यात येईल.

सर्व विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी योग्य ते साधन असण्याचे शाश्वती महाविद्यालयांनी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सर्व परीक्षांच्या वेळापत्रकांबाबत सर्व विद्यार्थ्यांना पूर्वसूचना देण्यात यावी. काही कारणास्तव विद्यार्थी परीक्षा देऊ शकला नाही. तर अशा विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात यावी, असेही विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.