मुंबई: कर्तव्यावर असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर चाकूहल्ला; हल्लेखोरास अटक

त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम 307 (हत्येचा प्रयत्न) , बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणे यांसह विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.

Police | Image Used for Representational Purpose Only | (Photo credits: PTI)

एका 27 वर्षीय व्यक्तीने केलेल्या चाकूहल्यात दोन मुंबई पोलीस कर्मचारी (Mumbai Police) जखमी झाले आहेत. ही घटना दक्षिण मुंबई परिसरात आज (9 मे 2020) पहाटे घडली. करण प्रदीप नायर असे हल्लेखोराचे नाव असल्याचे समजते. तो सिल्व्हर ओक इस्टेटमधील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. ब्रीच कँडी येथे कर्व्यावर असलेल्या पोलीसांवर प्रदीप याने हल्ला केला. या परिसरात पोलीस नाकाबंदीचे कर्तव्य बजावत होते.पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

मरीन ड्राईव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मृत्युंजय हिरेमठ यांनी पीटीआयला सांगितले की, ही घटना मध्यरात्री 1.30 च्या सुमारास घडली. ही घटना घडली तेव्हा ब्रीच कँडी परिसरात पोलीसांनी नाकाबंदी केली होती. ही नाकाबंदी हा पोलिसांच्या नियमीत कर्तव्याचा भाग आहे. हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात पोलीसांच्या खांद्याला आणि हाताला मोठी दुखापत झाली आहे. सध्या त्यांच्यावर जे जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, पीटीआयने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, पोलिसांनी रात्रीच्या वेळी एक मोठा सुरा घेऊन फिरताना एका व्यक्तिला पाहिले. त्या व्यक्तीला पोलिसांनी हटकले असता तो पळू लागला. पोलिसांनी त्याला पाटलाग करुन पकडण्याचा प्रयत्न केला. हा पाटलाग सुरु असताना प्राणसुखलाल मफतलाल हिंदू जलतरण तलाव (प्राणसुखलाल मफतलाल हिंदू जलतरण ) जवळ हा व्यक्ती थांबला. त्याने पोलिसांना धमकवण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याच्या धमकीला न घाबरता त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने पोलीस कर्मचाऱ्यांवर हातातील चाकूने हल्ला केला. (हेही वाचा, महाराष्ट्रात पोलीस दलातील 487 कर्मचाऱ्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह)

पीटीआय ट्विट

दरम्यान, हल्लेखोर करण प्रदीप नायर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम 307 (हत्येचा प्रयत्न) , बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणे यांसह विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.