मुंबई: ठाणे शहरात 2 लाखांच्या मालाची 154 पॅकेजेस घेऊन डिलेव्हरी एजंटचं काम करणारा तरूण फरार

तसेच त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

Home Delivery | Photo Credits: Pixabay.com

ठाणे शहरातील रहिवासी असणारा, डिलेव्हरी बॉयचं काम करणारा एक तरूण 2 लाखांचा माल असणारा 154 पॅकेजेस घेऊन पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान बनावट ओळखपत्र बनवून त्याने गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या या प्रकरणी कासारवडवली पोलिस स्थानकामध्ये तक्रार नोंदवण्यात आल्याचे वृत्त मुंबई मिरर कडून देण्यात आले आहे.

Futurz Travels and Logistics Pvt Ltd च्या रतन सिंह भाती यांच्याकडून 23 ऑगस्ट दिवशी तक्रार नोंदवण्यात आली आहे. दरम्यान गंडा घातलेल्या व्यक्तीचं नाव त्याने दिलेल्या कागदपत्रावर Sunil Mandarai असं देण्यात आलं होतं. तो ठाण्यातील धर्मवीर नगर परिसरातील नागरिक असून 24 जुलै दिवशी त्याने नोकरी स्वीकारली होती.

कंपनीकडे डिलेव्हरीसाठी सुरूवातीला या डिलेव्हरी बॉयला 55 पॅकेजेस देण्यात आली होती. काही वेळात 7 ठिकाणी ग्राहक उपलब्ध नसल्याने त्यांची डिलेव्हरी होऊ शकली नाही मात्र इतर पॅकेजेस पोहचवली असल्याचं त्याने मॅनेजरला कळवलं. नंतर त्याने डिलेव्हरीसाठी अजून काही पॅकेजेस मागितली. त्यामध्ये सुपरवायझरने त्याला 99 अधिक पॅकेज दिली. त्यानंतर तो संपर्काच्या बाहेर गेला. कंपनीला या गोष्टीवरून संशय आला. दरम्यान एकाही ग्राहकाला त्याचं पॅकेज मिळालेलं नव्हतं.

कंपनीच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी कागदपत्रांची छाननी सुरू केली. यामध्ये त्याने सादर केलेल्या कागदपत्रावरील पत्त्यावर ऑफिस कर्मचारी पोहचल्यानंतर त्यांना खरा Mandarai सापडला. त्याने दिलेल्या माहितीनुसार, डिलेव्हरी बॉय म्हणून काम करणारी व्यक्ती Raunak Kumar Shankar Jha नावाची आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच त्यांची ओळख आणि मैत्री झाली होती. एका फूड डिलेव्हरी कंपनीमध्ये नोकरी करण्यासाठी बाईकची गरज आहे. त्याच्याकडे बाईक नसल्याने ती घेण्यासाठी कागदपत्रांची मदत कर असं आवाहन त्याने केलं होतं. कागदपत्रावर नाव आणि फोटो बदलून त्याने Futurz Travels and Logistics Pvt Ltd मध्ये नोकरी मिळवून गंडा घातला आहे.

सध्या झा विरूद्ध पोलिस स्थानकामध्ये आयपीसी 408, 420 अंतर्गत गुन्हा दाखल आहे. तसेच त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.