मुंबई: सायन उड्डाणपूल प्रवासासाठी खुला; मात्र वाहतूककोंडीची समस्या कायम

अखेर आज उड्डाणपूल प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे.

Sion Flyover (Photo Credits: Twitter/@yogendra73)

मुंबईतील सायन उड्डाणपूलाचे (Sion Flyover Bridge) बेअरिंग बदलण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरु असल्याने प्रवाशांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत होते. अखेर आज उड्डाणपूल प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र पुलावरील एकच मार्गिका सुरु करण्यात आली असल्याने दुसऱ्या मार्गिकेवर वाहतूकीचा ताण येऊन प्रवाशांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे पुढील दोन महिने प्रवाशांना खडतर प्रवास करावा लागणार आहे.

सायन उड्डाणपूलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटनंतर पुलाचे बेअरिंग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. हे काम दोन महिने सुरु राहणार असल्याने आठवड्यातली चार दिवस हा पूल बंद राहणार आहे. मागील आठवड्यातही हा पूल चार दिवस बंद होता. मात्र पूलाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर आज पहाटे सहा वाजता उड्डाणपुलावरील एक मार्गिका वाहतूकीसाठी मोकळी करण्यात आली. तर दक्षिण मुंबईकडे जाणारी मार्गिका अद्यापही बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना अजूनही वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे. पूल दुरुस्तीच्या कामासाठी बंद असताना प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले होते. (मुंबई: सायन उड्डाणपूल दुरुस्ती कामाला आजपासून सुरुवात, वाहतूकीवर होणार परिणाम)

सायन उड्डाणपूलावरील पुढील ब्लॉक 20 ते 24 फेब्रुवारी या कालावधीत असणार आहे. पुलाच्या कामादरम्यान आठ ब्लॉक घेण्यात येणार असून एप्रिल महिन्याच्या अखेरीपर्यंत पूलाचे काम पूर्ण होईल, असा अंदाज एमएसआरडीसीने व्यक्त केला आहे.