मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराकडून शहीद जवानांच्या कुटुंबाना 51 लाखाची मदत जाहीर

या सोबतच मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरानेही ५१ लाखाची मदत जाहीर केली आहे.

सिद्धिविनायक (Photo Credit : Youtube)

काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात 44 जवान ठार झाले. यामध्ये महाराष्ट्रातील 2 जवानांचा समावेश होता. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे. काश्मीरमध्ये आज या जवानांना मानवंदना देण्यात आली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने जवानांच्या कुटुंबांना 50

लाखाची मदत जाहीर केली आहे. या सोबतच मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरानेही 51 लाखाची मदत जाहीर  केली आहे. सिद्धिविनायक मंदिर संस्थेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी ही माहिती दिली.

याचसोबत जखमी झालेल्या जवानांना पुण्यातील क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून 25 लाखांची मदत करण्यात येणार आहे. शुक्रवारी विश्वस्तांची एक महत्वाची बैठक पार पडली, यात हे निर्णय घेण्यात आले आहेत. हा प्रस्ताव विधी व न्याय विभागाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. उत्तर प्रदेश सरकारनेदेखील राज्यातील शाहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबाना 25 लाखाची मदत झाहीर केली आहे. (हेही वाचा : पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद नितीन राठोड,संजय राजपूत यांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची सरकारी मदत जाहीर)

जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा हल्ला झाला. या ताफ्यामध्ये एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-महम्मद या संघटनेने स्फोटकांनी भरलेली गाडी जवानांच्या ताफ्यावर आदळली. या स्फोटात 44 जवान जागीच ठार झाले.