IPL Auction 2025 Live

Mumbai Shocker: लोकल ट्रेनमध्ये चौथ्या सीटवरून झाला वाद; घाटकोपर स्थानकावर अल्पवयीन मुलाने चाकूने वार करून केली 35 वर्षीय व्यक्तीची हत्या

त्याचवेळी आरोपीने गुपचूप त्यांचा पाठलाग करत त्यांच्यावर पाठीमागून वार करून पळ काढला. त्यानंतर भालेराव यांना राजावाडी रुग्णालयात नेले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Death प्रतिकात्मक फोटो Photo Credit- X

मुंबईमध्ये (Mumbai) 15 नोव्हेंबर रोजी घाटकोपर (Ghatkopar) स्थानकावर लोकल ट्रेनमध्ये सीटवरून झालेल्या भांडणात एका मुलाने एका व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अहवालानुसार, टिटवाळ्यातील या 16 वर्षीय मुलाने 35 वर्षीय व्यक्तीवर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. खुनाच्या एक दिवस अगोदर मयत अंकुश भालेराव आणि त्याच्या साथीदारांचा ट्रेनमध्ये प्रवास करताना या मुलासोबत जोरदार वाद झाला होता. त्यानंतर दुसर्या दिवशी हा मुलगा चाकू घेऊन गेला आणि त्याने कामावर जात असलेल्या भालेराव यांच्यावर हल्ला केला.

गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) अखेर स्टेशनवर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा माग काढला आणि खुनाच्या दोन दिवसांनंतर टिटवाळा येथून त्याला पकडले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा मोठा भाऊ मोहम्मद सनाउल्ला बैथा (25) याला गोवंडी येथून अटक केली. त्याने आपल्या भावाला चाकू लपवण्यात आणि पकडण्यापासून वाचवण्यात मदत केल्याचा आरोप आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृत दोघेही टिटवाळा येथील रहिवासी आहेत. 14 नोव्हेंबरला ट्रेनमधील चौथ्या सीटवरून दोघांमध्ये भांडण सुरू झाले. बेनाली गावातील रहिवासी भालेराव आणि त्यांच्या इतर दोन मित्रांनी भांडणाच्या वेळी या अल्पवयीन मुलावर हल्ला केल्याचा आरोप आहे. यानंतर मुलाने भालेराव यांना जीवे मारण्याची धमकी दिली. दुसऱ्या दिवशी आरोपी टिटवाळ्याहून ट्रेनमध्ये चढला आणि घाटकोपर स्टेशनवर उतरला. तो भालेराव येण्याची वाट पाहू लागला. (हेही वाचा: Malabar Hill Murder Case: चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची गळा दाबून हत्या; मुंबईतील मलबार हिल परिसरातील घटना)

सकाळी दहाच्या सुमारास भालेराव खाली उतरले आणि ते आपल्या कामावर जाऊ लागले. त्याचवेळी आरोपीने गुपचूप त्यांचा पाठलाग करत त्यांच्यावर पाठीमागून वार करून पळ काढला. त्यानंतर भालेराव यांना राजावाडी रुग्णालयात नेले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मात्र, त्याआधीच पोलिसांनी त्यांचा  जबाब नोंदवला होता, ज्यामध्ये त्याने पोलिसांना आरोपीने दिलेल्या धमकीबद्दल सांगितले. ट्रेनमध्ये जेव्हा भांडण झाले होते तेव्हा भालेराव यांनी आरोपीचा फोटो काढला होता.