Mumbai: दहिसरच्या 'स्टेट बँक ऑफ इंडिया'वर दरोडा; गोळीबारात कर्मचाऱ्याचा मृत्यू, अडीच लाखाची रोकड लंपास

बँकेवर दरोडा पडला त्यावेळी बँकेत किमान आठ कर्मचारी होते

Representational Image (Photo Credits: PTI)

दिवसाढवळ्या काही चोरट्यांनी मुंबईतील (Mumbai) दहिसर (Dahisar) भागातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) शाखेत घुसून लुटमारीच्या उद्देशाने गोळीबार केला. या गोळीबारात बँकेचा एक कर्मचारी गंभीर जखमी होता, ज्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. चोरांनी फायर करुन बँकेतील अडीच लाख रुपये लुटून पळ काढला. या घटनेनंतर मुंबई पोलिसांचे पथक बँकेत हजर असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. हा कर्मचारी दरोडेखोरांना बँकेत प्रवेश करण्यापासून रोखत होता, त्यावेळी हल्लेखोरांनी त्याच्या छातीवर गोळीबार केला.

एमएचबी कॉलनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदेश गोमारे यांना बँकेने बाह्य एजन्सीकडे आउटसोर्स केलेले काम करण्यासाठी कराराच्या आधारावर नियुक्त केले होते. संदेश गोमारे बँकेबाहेर बसले असताना दुपारी साधारण 3.22 वाजता त्यांना नाक व तोंड रुमालाने झाकलेल्या दोन व्यक्ती संशयास्पदरित्या बँकेत शिरल्याचे दिसले. गोमारे यांनी त्या व्यक्तींना थांबवून त्यांची ओळख विचारली असता,  त्यांच्यापैकी एकाने देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर काढून गोमारे यांच्या छातीवर गोळी झाडली. (हेही वाचा: शिवडी रेल्वे स्थानकामध्ये मोटारमॅनच्या सतर्कतेने रेल्वे रूळावर आत्महत्येसाठी पडलेल्या व्यक्तीला मिळाले जीवनदान)

त्यानंतर हे लोक बँकेत घुसले व त्यांनी रोख रक्कम लुटली. कर्मचाऱ्यांनी अलार्म वाजवायच्या आधीच ते बँकेतून पळून गेले. एमएचबी पोलीस स्टेशनच्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘दरोडेखोरांनी दोन मिनिटांतच त्यांच्या हाती जी काही काही रोख रक्कम लागेल ती घेतली व पळ काढला.’ त्यानंतर बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. गोमारे यांना शताब्दी रुग्णालयात नेले, तेथे पोहोचताच त्यांना मृत घोषित करण्यात आले. गोमारे हे विरारचे रहिवासी होते.

साक्षीदारांच्या जबाबाच्या आधारे पोलिसांना समजले की, दरोडेखोर अंदाजे 20 ते 25 वर्षांचे असून ते दहिसर रेल्वे स्थानकाच्या दिशेने पळून गेले होते. बँकेवर दरोडा पडला त्यावेळी बँकेत किमान आठ कर्मचारी होते. बँक जवळजवळ बंद होण्याची वेळ आली होती व त्यावेळी बँकेत गर्दीही नव्हती. पोलिसांनी दोन अनोळखी पुरुषांविरुद्ध खून आणि दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे आणि आता दरोडेखोरांची ओळख शोधण्यासाठी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही स्कॅन केले जात आहे.