Mumbai Ring Roads: लवकरच मुंबईकरांना वाहतूक कोंडीपासून मिळणार दिलासा! शहराभोवती बांधले जाणार 5 रिंग रोड, जाणून घ्या मार्ग
या बोगद्यामुळे मुंबईकरांच्या सर्वात आवडत्या आणि प्रसिद्ध मरीन ड्राइव्हपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे. ट्रॅफिक जॅमचा सामना न करता लोक आरामात येथे पोहोचू शकतील.
प्रत्येक मोठ्या शहराची डोकेदुखी म्हणजे वाहतूक कोंडी. सकाळी घरून ऑफिसला जाणे असो किंवा संध्याकाळी ऑफिसमधून घरी येणे असो, दररोज लाखो लोक ही समस्या अनुभवतात. मुंबईसारख्या (Mumbai) मेट्रो सिटीमध्ये तर ही समस्या आणखी गंभीर बनत चालली आहे. आता सरकारने यावर तोडगा काढला असून, लवकरच मायानगरीभोवती एक-दोन नव्हे, तर 5 रिंगरोड (Mumbai Ring Roads) बांधले जाणार आहेत. हे रोड्स बसेससाठी पूर्णपणे समर्पित असतील, जेणेकरून सर्वसामान्यांना शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत ये-जा करताना कोणतीही अडचण येणार नाही. ठाणे, पालघर आणि अलिबाग यांसारख्या मुंबईच्या आसपासच्या भागात कोणत्याही जामशिवाय आणि कमी वेळेत लोकांची वाहतूक सुनिश्चित करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
मुंबईत उभारल्या जात असलेल्या या रिंग प्रकल्पांपैकी सर्वात महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे ऑरेंज गेट बोगदा. या बोगद्यामुळे मुंबईकरांच्या सर्वात आवडत्या आणि प्रसिद्ध मरीन ड्राइव्हपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे. ट्रॅफिक जॅमचा सामना न करता लोक आरामात येथे पोहोचू शकतील.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मुखर्जी म्हणाले की, आमची योजना केवळ मुंबई शहरातील लोकांना रिंग रोड देऊन वाहतूक कोंडीपासून दिलासा देणे नाही, तर आसपासच्या केह्त्रातील लोकांनाही ट्राफिकमुक्त सुविधा उपलब्ध करून देणे हे आहे. त्यासाठी 5 रिंगरोड तयार करण्याचा आराखडा तयार केला असून काहींची कामे सुरू झाली आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे 70 हजार कोटी रुपये खर्च होणार असल्याचा अंदाज आहे. यातील अनेक बसेससाठी समर्पित रस्ते असतील, ज्यावर ठिकठिकाणी बस थांबे बनवले जातील. (हेही वाचा: Samruddhi Expressway to Get Wayside Hubs: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील अपघात कमी होण्याची शक्यता; पुढील सहा महिन्यात एक्सप्रेसवेच्या दोन्ही बाजूंना निर्माण होऊ शकतात मुलभूत सुविधा)
नवीन रस्ते पर्यायी वर्तुळाकार मार्ग देऊन, शहराच्या अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत करतील. हे रस्ते पूर्व फ्रीवे, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि कोस्टल रोडसह, जोडणारे पूल आणि बोगद्यांद्वारे विद्यमान आणि अंशतः अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधांवर बांधले जातील. यातील 3 दक्षिण मुंबईला उपनगरांशी, मुंबईला ठाण्याशी आणि शहराला पालघर-अलिबागशी जोडतील. विरार-अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर अद्याप नियोजनाच्या टप्प्यात असल्याने पाचवा, उत्तरेकडील रिंगरोड प्रत्यक्षात येण्यासाठी काही वेळ लागू शकतो.
जाणून घ्या पाच प्रकल्प कुठे बांधले जाणार-
ईस्टर्न फ्रीवे: हा बोगदा शहीद भगतसिंग रोडवरील ऑरेंज गेटजवळून सुरू होईल आणि मरीन ड्राइव्हवरील कोस्टल रोडला पोहोचेल. तो वरळी ते वरळी-शिवारी लिंक रोडला जोडेल, जो ईस्टर्न फ्रीवे आणि अटल सेतूला जोडला जाईल.
कोस्टल रोड-वांद्रे वरळी सी-लिंक: हा रस्ता ईस्टर्न फ्रीवेवर घाटकोपरजवळ बीकेसीला एससीएलआरला जोडेल. याशिवाय ईस्टर्न फ्रीवेचा विस्तार छेडा नगर-आनंद नगरपर्यंत करण्यात येणार आहे.
वांद्रे वरळी सी लिंक-वांद्रे वर्सोवा सी-लिंक: हा रिंग रोड वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला गोरेगाव मुलुंड लिंक रोडला जोडेल. तो ईस्टर्न फ्रीवे एक्स्टेंशनला ऐरोली जंक्शनजवळील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला देखील जोडेल.
वांद्रे वर्सोवा सी लिंक-दहिसर भाईंदर: हा रस्ता ठाणे क्रीक एलिव्हेटेड रोडपासून निघेल आणि फाउंटन जंक्शन नंतर बोगदा आणि गायमुखला जोडेल. खारेगावकडे जाणाऱ्या ठाणे कोस्टल रोडवरील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेला तो जोडेल. इथला 8 किलोमीटरचा उन्नत रस्ता घाटकोपर आणि दक्षिण मुंबईला ईस्टर्न फ्रीवे एक्स्टेंशनद्वारे जोडेल.
विराग-अलिबाग कॉरिडॉर: हा रस्ता नवघर आणि बलावलीला एक्स्प्रेस वेद्वारे जोडतो. 126 किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे रुंदीकरण 8 ते 14 लेनपर्यंत करण्यात येणार आहे.