Mumbai Ram Navami Procession: रामनवमी शोभायात्रेदरम्यान दोन गटात वाद, पोलिसांकडून सौम्य लाठीमार; मुंबईतील मालवणी येथील घटना
दोन गट आमनेसामने आल्याने वाद निर्माण झाला. काही काळ तणावाचे वातावरणही पाहायला मिळाले. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
Mumbai News: मुंबईतील मालवणी (Malvani) परिसरात रामनवमी (Ram Navmi 2023) निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेत दोन गटांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. दोन गट आमनेसामने आल्याने वाद निर्माण झाला. काही काळ तणावाचे वातावरणही पाहायला मिळाले. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. पोलिसांना जमावाला पांगविण्यासाठी काही ठिकाणी सौम्य लाठीमारही करावा लागल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, भाजप युवा मोर्चा आणि बजरंग दल संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मालवणी पोलीस स्टेशनबाहेर जोरदार निदर्शने केली. त्यानंतर मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पोलीस स्टेशनला भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि माहिती घेतली.
रामनवमी निमित्त मुंबईतील मालाड येथील मालवणी परिसरात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मिरवणूक सुरु असताना काही गटांमध्ये तणाव निर्माण झाला. पोलिसांनी वेळीच गांभीर्य ओळखून आवश्यक ती कारवाई केली. ज्यामुळे संभाव्य धोका टळला. संपूर्ण मिरवणूक पार पडल्यावर पोलिसांनी आवश्यक ती कायदेशीर कारवाई पूर्ण करण्यासही प्राधान्य दिले. (हेही वाचा, छत्रपती संभाजीनगर येथे दोन गटात राडा; जोरदार दगडफेक, जमावाने पोलीस वाहनांसह 13 गाड्या जाळल्या)
मिरवूक सुरु होण्यापूर्वी आणि मिरवणूक पार पडल्यानंतरही स्थानिक पोलिसांकडून गस्त घालणे सुरु होते. मिरवणुकीदरम्यास विघ्नसंतोषी घटनांना चिथावणी देण्याचा प्रयत्न करत असलेल्या लोकांचा पोलिसांकडून शोध सुरु होता. दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. शिवाय परिस्थिती नियंत्रणात असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असेही पोलिसांनी म्हटले आहे.
ट्विट
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे रामनवमीच्या आदल्या दिवशीघडलेल्या घटनेनंतर महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले आहे. सण, उत्सवाच्या वेळी कोणतीही अनुचीत घटना टाळण्यासाठी पोलिसांनी आवश्यक खबरदारी घेण्यास सुरुवात केली केली आहे. महाराष्ट्र पोलीस नेहमची सतर्क असतात. परंतू, तरीही कधी कधी सामाजिक तेड निर्माण करणाऱ्या घटना घडतात. ज्यामुळे परिस्थिती चिघळते पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई करावी लागते. छत्रपती संभाजीनगर येथे घडलेल्या घटनेनंतरही पोलिसांनी आवश्यक ती कायदेशीर कारवाई सुरु केली असल्याची माहिती आहे.