Mumbai Rain Update: मुंबईत आज सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात; दादर मधील काही भागात वॉटर लॉगिंगची समस्या

आठवड्याचा पहिला सोमवार असून आज श्रावणातील पहिला श्रावणी सोमवार आहे. त्यात हा छान पाऊस म्हणजे चांगला योगायोगच म्हणावा लागेल.

Mumbai Monsoon 2019 | (Photo Credits: ANI)

मुंबईत गेले 2-3 दिवसापासून दडी मारून बसलेल्या पावसाने आज सकाळपासून जोरदार हजेरी लावली. मुंबईतील सायन (Sion), अंधेरी (Andheri), कुर्ला (Kurla), दादर (Dadar) भागात सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळे दादरच्या हिंदमाता परिसरात वॉटर लॉगिंगची (Water Logging) समस्या निर्माण झाली आहे. तर भांडूप (Bhandup), कांजूरमार्ग (Kanjurmarg), मुलूंड (Mulund) आज सकाळपासून मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. आठवड्याचा पहिला सोमवार असून आज श्रावणातील पहिला श्रावणी सोमवार आहे. त्यात हा छान पाऊस म्हणजे चांगला योगायोगच म्हणावा लागेल.

गेल्या 2-3 दिवसापासून पावसाने मुंबईत चांगलीच विश्रांती घेतली होती. यामुळे गेले काही दिवस उकाडा जाणवू लागला होता. अशातच आज सकाळपासून मुंबईत सुरु झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा आल्याने मुंबईकरांची सकाळ खूपच छान गेली. आज सकाळपासूनच दादर, सायन,माटुंगा, अंधेरी, ब्रांदा यांसारख्या अनेक भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे दादरच्या हिंदमाता परिसरात वॉटर लॉगिंगची समस्या निर्माण झाली. Maharashtra Monsoon Update: मुंबई, पुणे, नाशिक व कोकणात आज संध्याकाळी पावसाचे अंदाज- IMD

Watch Video:

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसात फार जोरदार पावसाची शक्यता अगदी धुसर आहे. मुंबई सह महाराष्ट्राच्या इतर भागात मागील काही दिवसांत अधून मधून जोरदार सरी बरसत आहेत. परंतू धरणक्षेत्र आणि तलावांमध्ये अद्याप पुरेसा पाऊस नसल्याने थोडी चिंता वर्तवण्यात येत आहे. TOI च्या रिपोर्ट्सनुसार, यंदा मुंबईच्या तलावांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 50% पेक्षा कमी पाणीसाठा आहे. परंतू अद्याप मुंबई महानगरपालिकेने शहरात पाणीकपात जाहीर केलेली नाही.