महापौर विश्वनाथ महाडेश्वर जाड भिंगाच्या चष्म्यातून पाहणार मुंबईचा पाऊस; मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून खास सोय

छे... 'मुंबईत पाणी तुंबलंच नाही' असा निराधार दावा केला होता. त्यामुळे महाडेश्वर हे प्रसारमाध्यमांतून चर्चा आणि टीकेचा विषय ठरले होते. या पार्श्वभूमिवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापौरांची खिल्ली उडवली. परंतू, ही खिल्ली उडवताना मनेसेने खरोखरच जाड भिंगाचा चष्मा महापौरांकडे पाठवून दिला आहे.

Mumbai Mayor Vishwanath Mahadeshwar | (Photo credit: archived, edited, symbolic images)

मुंबई शहराचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर (Mumbai Mayor Vishwanath Mahadeshwar) हे आता मुंबईचा पाऊस जाड भिंगाच्या चष्म्यातून पाहू शकणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे सरचिटणीस सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि संतोष धुरी यांनी ही व्यवस्था केली आहे. मुसळधार पावसाने पाणीच पाणी चोहीकडे अशी राजधानी मुंबई शहराची स्थिती असताना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मात्र 'छे.. छे... 'मुंबईत पाणी तुंबलंच नाही' असा निराधार दावा केला होता. त्यामुळे महाडेश्वर हे प्रसारमाध्यमांतून चर्चा आणि टीकेचा विषय ठरले होते. या पार्श्वभूमिवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापौरांची खिल्ली उडवली. परंतू, ही खिल्ली उडवताना मनेसेने खरोखरच जाड भिंगाचा चष्मा महापौरांकडे पाठवून दिला आहे.

मनसे मोफत वाटणार चष्मे

दरम्यान, महापौरांना चष्मा पाठवण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना संदीप देशपांडे यांनी म्हटलं की, 'मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर साहेब यांना मुंबईत तुंबलेलं पाणी, लोकांना झालेला त्रास दिसलाच नाही. ते स्वत: म्हणाले शिक्षक आहेत त्यामुळे खोटे बोलत नाही. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की त्यांना दिसण्याचा प्रॉब्लेम असावा. म्हणून खास महापौरांसाठी हा जाड भिंगाचा चष्मा आणला आहे. या चष्म्यातून तरी महापौरांना दिसावं, अशी आमची अपेक्षा आहे. हा चष्मा आम्ही महापौरांना कुरिअरने पाठवत आहोत. ज्या नेत्यांना मुंबईची दुरावस्था दिसत नाही, त्या सर्वांसाठी मोफत चष्मा पाठवण्याचं काम मनसे करेल' (हेही वाचा, छे.. छे... 'मुंबईत पाणी तुंबलंच नाही'; महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा अजब दावा)

छे.. छे... 'मुंबईत पाणी तुंबलच नाही'

मुंबई शहरात पाणी साचल्याबद्दल प्रसारमाध्यमांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना विचारले असता, तुम्ही उगाच प्रश्न निर्माण करत आहात. मुंबई कुठेच तुंबली नाही. इतकंच नव्हे तर, कुठेही पाणी तुंबलेलं नाही किवा वाहतूक कोंडी झालेली नाही. मुंबईचे जनजीवन अजिबात विस्कळीत झालेलं नाही’, असा निराधार दावा केला. तसेच, ज्या काही भागात पाणी साचले होते त्या भागात पंपाद्वारे पाण्याचा उपसा करण्यात आला. त्यामुळे पाण्याचा निचरा झाला. महापौर म्हणून मी सर्व ठिकाणी फिरलो. कुठेही मला पाणी तुंबलेलं दिसलं नाही. मुंबईचे जनजीवन सुरळीत सुरु असल्याचा दावा करताना मात्र कचरा किंवा प्लास्टिक अडकल्याने पाणी मुंबईत पाणी साठत असल्याचंही ते या वेळी म्हणाले होते.