डेक्कन क्विन एक्स्प्रेस होणार अधिक सुसाट; मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ 30-35 मिनिटांनी कमी होणार
महाराष्ट्राच्या दोन प्रमुख शहरांना म्हणजे मुंबई-पुण्याला जोडणारी डेक्कन क्विन एक्स्प्रेसने प्रवास करताना प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
डेक्कन क्विनच्या प्रवाशांसाठी एक सुखद बातमी आहे. महाराष्ट्राच्या दोन प्रमुख शहरांना म्हणजे मुंबई-पुण्याला जोडणारी डेक्कन क्विन एक्स्प्रेसने प्रवास करताना प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. पुश अॅंड पुल या नवीन तंत्रज्ञानामुळे हे शक्य होणार आहे. हे तंत्रज्ञान वापरणारी डेक्कन क्विन ही दुसरी एक्स्प्रेस ठरणार आहे. यापूर्वी सीएसएमटी-निझामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसमध्ये हे तंत्रज्ञान वापरण्यात आले होते.
या ट्रेनने दररोज हजाराहून अधिक प्रवासी प्रवास करतात. यात वकील, सरकारी कर्मचारी, व्यावसायिकांचा समावेश असतो. जे कामानिमित्त पुण्याहून मुंबईला येतात. या दररोजच्या प्रवासातील अर्धा तास वाचणे प्रवाशांसाठी फार मोलाचे ठरणार आहे.
सध्या डेक्कन क्विन एक्स्प्रेस पुण्याहून सकाळी 7:15 वाजता सुटते आणि सीएसएमटीला सकाळी 10:25 मिनिटांनी पोहचते. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा सीएसएमटीवरुन 5:10 ला ही ट्रेन निघते आणि पुण्यात 8:25 पर्यंत पोहचते. आता तुम्हाला 30-35 मिनिटे लवकर मुंबईत किंवा पुण्यात पोहचता येईल.
पुश अॅंड पुल या टेक्निकमुळे दोन्ही शहरातील अंतर 30 ते 35 मिनिटांनी कमी करणे शक्य होणार आहे. या टेक्निकमध्ये पुढे आणि मागे असे दोन लोकोमोटीव्ह असतील त्यामुळे ट्रेनला स्थैर्य येते. यामुळे वळणावर कमी जास्त करण्यात लागणारा वेळ वाचणार आहे. हे नवीन रेक पुढील महिन्यात जोडले जातील.