कायदा मोडून फटाके फोडले; मुंबईत पहिला गुन्हा दाखल; पोलीस आरोपींच्या शोधात

तसेच, ख्रिसमस आणि न्यू इयरच्या दिवशीही रात्री ११.४५ ते १२.१५ कालावधीतच फटाके फोडावेत असे न्यायालयाने म्हटले आहे.

Firecrackers (Photo credits: Unsplash)

सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करुन फटाके फोडल्या प्रकरणी पहिला गुन्हा मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईतील ट्रॉम्बे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. फटाके उडवणाऱ्या आरोपींची नेमकी नावे समजू न शकल्याने पोलिसांनी दोन अज्ञात तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींच्या मागावर आहेत.

वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी दिवाळी उत्सव काळात फटाके फोडण्यावर राज्य सरकारने बंदी घातली होती. दरम्यान, विविध संघटनांनी या बंदीविरोधात न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय देत फटाके फोडण्यावरील बंदी कायम ठेवली. तसेच, फटाके फोडायचेच असतील तर, त्यासाठी घालून दिलेल्या विशिष्ट नियम आणि कालावधीचे निर्देशांचे पालन करावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

दरम्यान, ज्या नागरिकांना फटाके फोडायचे आहे त्यांनी, रात्री आठ ते दहा या कालावधीच फटाके फोडावेत. तसेच, या निर्देशांचे पालन काटेकोरपणे व्हावे यासाठी स्थानिक प्रशासनाने नजर ठेवावी असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. न्यायालयाच्या निर्देशाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी राज्यभर विशेष पथके स्थापन केली आहे. पोलीसांच्या कडक निगराणीमुळे यंदा फटाक्यांचा आवाज कमी झाला असला तरी, काही ठिकाणी अद्यापही फटाके फुटत आहेत. दरम्यान, ट्रॉम्बे येथे अभ्यंगस्नानाच्या दिवशी दोन तरुणांनी सोसायटीच्या आवारात फटाके फोडलेच. त्यामुळे कारवाई करत ट्रॉम्बे पोलिसांनी अज्ञात तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला. (हेही वाचा, फटाके फोडताना घ्या 'ही' काळजी ; साजरी करा safe दिवाळी)

पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. मात्र, अद्याप या प्रकरणात कोणत्याही व्यक्तीस अटक करण्यात आली नाही. पोलीस अद्यापही आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र, फटाके फोडण्याबाबत न्यायालयाने घालून दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन घडल्याप्रकरणी दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा आहे. त्यामुळे पोलीस पुढे काय कारवाई करतात याला महत्त्वा आले आहे.

दिवाळी दरम्यान, रात्री आठ ते १० या कालावधीत फटाके फोडण्यासाठी न्यायालयाने मान्यता दिली आहे. तसेच, ख्रिसमस आणि न्यू इयरच्या दिवशीही रात्री ११.४५ ते १२.१५ कालावधीतच फटाके फोडावेत असे न्यायालयाने म्हटले आहे.